महसूल मंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना दिवाळी भेट
मुंबई : राज्यातील काही महसूल अधिकाऱ्यांना राज्य सरकारकडून पदोन्नतीची भेट देण्यात आली. यामध्ये महसूल विभागातील 47 अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी), उपजिल्हाधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी पदावर बढती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, निवडश्रेणी मिळालेल्या भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा झाला आहे. सोमवारी याबाबतचे शासन आदेश जारी करण्यात आले आहेत.
राज्याच्या महसूल विभागाकडून अनेक लोकाभिमुख योजना राबवण्यात येत असून, त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये अधिकाऱ्यांचा मोठा वाटा असतो. त्यांच्या पदोन्नतीमुळे आणि बदल्यांमुळेही हा कामे अधिक गतीने होण्यास मदत होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पदोन्नतीचा प्रश्न प्रलंबित होता. पदोन्नतीमुळे अधिकाऱ्यांमध्ये कामाचा उत्साह वाढतो आणि कामाला गतीही मिळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक सरकार आणि गतिमान प्रशासन देण्याचा आमचा कायम आहे. या बढतीमुळे अनेक अधिकाऱ्यांचा आयएएस होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
दरम्यान, दिवाळीतच त्यांची पदोन्नती व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर या अधिकाऱ्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यात आम्हाला यश आले, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
अनेक वर्षांपासून पदोन्नती प्रलंबित
महसूल विभागात गेल्या 15 ते 19 वर्षापासून उपजिल्हाधिकारी पदांवरील अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली नव्हती. एकाच पदावर अनेक वर्षे काम केल्याने येणारा तोच तोपणा आला होता. या निर्णयामुळे महसूल विभागात नवचैतन्य निर्माण झाले आहे. यापूर्वी दुर्गम भागात अनेक वर्ष राहिलेल्या अधिकाऱ्यांना मुंबई, पुणे या शहरातही बढती व बदली यापूर्वी करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा