Photo Creidt- Social Media
मुंबई : राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी तीन कोटी रूपयांची तरतूद केली असून, याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यासाठी सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्म योजनेच्या प्रसिद्धीसाठी हा खर्च केला जाणार आहे. या जाहिरातीतून योजनेची माहिती आणि त्याच्या अटी तसेच शर्तीही अवगत केल्या जाणार आहेत.
हेदेखील वाचा : महिलांनो, तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताय? तर ‘ही’ बातमी ठरू शकते महत्त्वाची…
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णयाक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्त्वकांक्षी योजना राबवण्यात येत आहे. या योजनेसाठी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या आराखडा आणि त्याकरिता होणाऱ्या खर्चासाठी तीन कोटी रुपयांची मान्यता देण्यात येत आहे. सोशल मीडियावरील खर्चासाठी दीड कोटी आणि डिजिटल मीडियावरील खर्चासाठी दीड कोटी अशा एकूण तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजना ठरतीये प्रसिद्ध
मागील महायुती सरकारच्या काळातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगली प्रसिद्ध झाली आहे. अनेक महिलांनी त्यासाठी अर्ज केले असून, त्याचे पैसेही खात्यात आले आहेत. असे असताना आता राज्यातील ‘ज्या लाडक्या बहिणींनी नियम व अटीशर्तींचे पालन न करता अर्ज भरले आहेत, त्यांच्याकडून आता दंडासह पैसे वसूल केले जाऊ शकतात, असे सांगण्यात येत होते.
बच्चू कडूंचा हल्लाबोल
माजी आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “ही स्कीम लाडक्या बहिणीसाठी नव्हती तर सत्तेत येण्यासाठी होती, सत्तेत येण्यासाठी करोडो लाडक्या बहिणीची चाचपणी न करता त्यांना पैसे देऊन टाकले. सरकारने मतं घेतली. मात्र, आता लाडक्या बहिणींचे पैसे बंद करणार, ही त्यांची फसवणूक आहे, त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली त्या लाडक्या बहिणींनी आता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. लाडकी बहिण योजनेतून अनेक महिला आता अपात्र ठरल्या जात आहेत. यामध्ये निवडणूक आयोगाने पारदर्शक विचार करून चौकशी केली पाहिजे,” असे स्पष्ट मत माजी आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले.
हेदेखील वाचा : “अफवांना आणि अपप्रचारांना बळी पडू नका…”; लाडकी बहीण योजनेवरुन आदिती तटकरेंनी केले महिलांना सावध