Pune Land Scam News: ताथवडे जमीन घोटाळा: ताथवडेतील सरकारी जमिनीच्या बेकायदेशीर विक्रीचा पर्दाफाश
पुणे (Pune) जिल्ह्यातील ताथवडे (ता. मुळशी) येथील पशुसंवर्धन विभागाच्या मालकीच्या जमीन गट क्रमांक ३२ बाबत हा मोठा गैरव्यवहार समोर आला आहे. या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर ‘मा. आयुक्त पशुसंवर्धन यांचा ताबा’ आणि ‘शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय खरेदी-विक्रीस बंदी’ असा स्पष्ट उल्लेख होता. असे असतानाही नियम धाब्यावर बसवून व्यवहार करण्यात आला.
हवेली क्र. १७ उपनोंदणी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी नोंदणीच्या वेळी संगणकीय प्रणालीतील ‘स्किप’ (Skip) या पर्यायाचा चुकीचा वापर केला. या तांत्रिक पळवाटेचा आधार घेऊन बेकायदेशीर खरेदीखत नोंदवण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, जमिनीचा मूळ मालक मृत असताना आणि त्यांच्या वारसांची कोणतीही नोंद नसतानाही ही विक्री प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या नोंदणी कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. या घोटाळ्यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे. अशा प्रकारे ‘स्किप’ पर्यायाचा वापर करून इतर किती जमिनींची बेकायदेशीर नोंदणी झाली आहे, याचा शोध घेण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.
आमदार अमित गोरखे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे या गंभीर गैरव्यवहाराकडे सभागृहाचे लक्ष वेधले. अशा प्रकारे तांत्रिक त्रुटींचा गैरवापर करून सरकारी जमिनी लाटण्याचे प्रकार इतर जिल्ह्यांतही सुरू आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, या प्रकरणातील दोषी अधिकारी आणि विकासक यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी लावून धरली.
आमदार गोरखे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना महसूल मंत्री की, या प्रकरणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रभारी दुय्यम निबंधक विद्या बडे (सांगळे) आणि वरिष्ठ लिपिक यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच, पशुसंवर्धन आयुक्तांच्या तक्रारीवरून दापोडी पोलीस ठाण्यात १५ नोव्हेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील पोलीस चौकशी वेगाने सुरू आहे.
शासकीय जमिनी हडपण्याचे आणि जनतेच्या पैशावर दरोडा टाकण्याचे प्रकार कदापि खपवून घेतले जाणार नाहीत. या प्रकरणातील मूळ सूत्रधार आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई होईपर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहील. पारदर्शक कारभारासाठी अशा प्रवृत्तींना आळा घालणे आवश्यक आहे.






