फोटो सौजन्य - वसंत मोरे एक्स (ट्वीटर) अकाऊंट
पुणे : पुण्याच्या राजकारणामध्ये मोठा बदल झालेला आहे. वसंत मोरे हे आज मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधणार आहेत. वसंत मोरे यांनी मागील आठवड्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला राम राम ठोकला. लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी वंचितमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता एका महिन्यामध्ये वंचितची साथ सोडत ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. आज त्यांच्या जाहीर पक्षप्रवेश पार पडणार आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाची पुण्यामध्ये ताकद वाढणार आहे. पक्षप्रवेशापूर्वी वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
काय म्हणाले वसंत मोरे?
माध्यमांशी संवाद साधताना वसंत मोरे यांना शिवसेनेमध्ये कोणती जबाबदारी पार पाडणार असा सवाल विचारण्यात आला. यावर उत्तर देताना वसंत मोरे म्हणाले, मला कुठलाही शब्द देण्यात आलेला नाही. मी कोणताही शब्द उद्धव ठाकरेंकडून घेतलेला नाही. उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पक्षात जात आहे. जी जबाबदारी मला पक्ष देईल ती जबाबदारी मी नक्कीच पूर्ण करेन” असे स्पष्ट मत वसंत मोरे यांनी मांडले आहे. त्यामुळे यापुढे वसंत मोरे यांचा राजकीय प्रवास कसा असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभेपूर्वीची समीकरणे
लोकसभा निवडणुकीवेळी वसंत मोरे यांनी मनसे व राज ठाकरे यांची साथ सोडली. लोकसभा निवडणुकीसाठी उत्सुक असलेल्या वसंत मोरे यांना उमेदवारी न दिल्यामुळे ते नाराज होते. यावेळी त्यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. यावेळी देखील त्यांनी महाविकास आघाडीसोबत चर्चा केली होती. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वसंत मोरे यांना वंचितचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले. मात्र प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीमध्ये मोरेंचा दारुण पराभव झाला. अगदी डिपॉझिट देखील जप्त झाल्यानंतर वसंत मोरे यांनी अवघ्या महिन्याभरात वंचितची साथ सोडली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.