पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडी 5 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहे (फोटो - सोशल मीडिया)
Pune Mumbai expressway Traffic : लोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग पुन्हा एकदा वाहतूक कोंडीमध्ये अडकला आहे. यापूर्वी दोन दिवस झालेल्या वाहतूक कोंडीनंतर आज पुन्हा एकदा घाटामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. विशेषतः घाट परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहनांच्या तब्बल ४ ते ५ किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाढलेल्या वाहनसंख्येमुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याची परिस्थिती निर्माण झाली. (Maval News)
राम नवमीच्या दिवशी पुणे मुंबई महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असल्याचे लक्षात येताच वाहतूक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. टप्प्याटप्प्याने वाहनांना मार्ग मोकळा करून देण्यात येत असला तरी मोठ्या प्रमाणात अडकलेल्या वाहनांमुळे प्रवाशांना दीर्घकाळ प्रतिक्षा करावी लागत आहे.
हे देखील वाचा : झिरवळांना अडकवण्यासाठी कुणी सापळा रचला; वडेट्टीवारांचा विधानसभेत लेटरबॉम्ब
या वाहतूक कोंडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून त्यामध्ये घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचे स्पष्ट दिसते. अनेक वाहनचालक गाड्यांमधून उतरून रस्त्यावर उभे राहत वाहतूक सुरळीत होण्याची वाट पाहताना दिसत आहेत.
रामनवमीच्या सुट्टीमुळे महामार्गावर वाहनांची संख्या अचानक वाढल्याने ही कोंडी झाल्याचे सांगितले जात आहे. या परिस्थितीमुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला असून काहींनी सोशल मीडियावर खोचक प्रतिक्रिया देताना “मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचा ‘संथ मार्ग’ म्हणून उल्लेख करावा,” अशी टिप्पणी केली आहे. काही प्रवाशांनी दररोज २५ ते ४५ मिनिटांचा उशीर होत असल्याचेही नमूद केले आहे.
हे देखील वाचा : मावळात APMCच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला दणका! बहुमत असूनही भाजपचे सुभाषराव जाधव सभापती
मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांना जोडणारा हा देशातील अत्यंत व्यस्त मार्गांपैकी एक आहे. विशेषतः घाट परिसरातील भौगोलिक परिस्थितीमुळे येथे वारंवार कोंडीची समस्या निर्माण होते. याशिवाय एखादे वाहन बंद पडणे किंवा अपघात झाल्यास परिस्थिती अधिकच गंभीर बनते. दरम्यान, या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी प्रवाशांकडून पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.






