पुणे पेट्रोल पंप स्ट्राइक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी संध्याकाळी सातनंतर पेट्रोल पंप बंद राहणार आहे (फोटो - सोशल मीडिया)
पुण्यातील येरवडा येथील IOC पेट्रोल पंपावरील ग्राहक परिचारकावर हल्ला झाला, यानंतर १६ नोव्हेंबर रोजी भैरोबानाला येथील IOC पेट्रोल पंपावर पुन्हा एक हिंसक हल्ला झाला. यामुळे पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेकदा रात्री पेट्रोल पंपावर पेट्रोल भरुन झाल्यानंतर कर्मचाऱ्यांवर पैसे न देता हल्ला केला जातो. याचा घटनांच्या निषेधार्थ पुणे पेट्रोल डिलर्स असोसिएशन आक्रमक झाली आहे. पुण्यामध्ये येरवडा आणि भैरोबानाला या दोन ठिकाणी झालेल्या भ्याड हल्ल्याच्या घटनांचा पेट्रोल डिलर्स असोसिएशनने तीव्र निषेध केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या घटनांबाबत असोसिएशनने तातडीने पुणे शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कठोर आणि तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त तसेच पुणे ग्रामीणच्या अधीक्षकांना देखील लिखित निवेदन पाठविण्यात आले आहे.
रात्री आणि उशिराच्या वेळेस पंपांवर वाढत चाललेल्या असुरक्षित वातावरणावरही आम्ही तीव्र भूमिका घेतली आहे. अशा घटना वारंवार घडल्यामुळे जनतेची सेवा करणाऱ्या आपल्या फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांच्या मनात भीती निर्माण होते. परिस्थिती सुधारली नाही आणि हल्ले पुन्हा घडले, तर संपूर्ण पुणे जिल्ह्यातील पंप रात्री ७ नंतर बंद ठेवण्यास आम्हाला भाग पडेल, अशी भूमिका पेट्रोल डिलर्स असोसिएशन कडून घेण्यात येत आहे. तसेच पेट्रोल पंपांवरील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या सुरक्षा, सन्मान आणि संरक्षणासाठी आम्ही ठामपणे उभे आहोत, असे कार्यकारिणीने सांगितले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुण्यातील पेट्रोल पंप संध्याकाळी सात नंतर बंद असणार आहेत. यानंतर पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी देखील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, “परिचारक हे केवळ कर्मचारी नाहीत — ते शहराच्या इंधनपुरवठ्याची जबाबदारी सांभाळणारे फ्रंटलाइन सेवा प्रदाते आहेत. त्यांची सुरक्षा, प्रतिष्ठा आणि कल्याण ही आमची अपरिहार्य बांधिलकी आहे. कर्मचाऱ्यांवर हल्ला केला, तर असोसिएशन एकजुटीने आणि निर्णायक पद्धतीने कारवाई करेल.” असे अध्यक्ष ध्रुव रुपारेल म्हणाले आहेत.






