संग्रहित फोटो
पुणे : वैभवशाली गणेशोत्सावात गर्दीचा फायदा घेऊन गणेश भक्ताचे मोबाईल चोरणाऱ्या झारखंडच्या टोळीला पकडण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे, ही टोळी दर तीन ते चार महिन्याला पुण्यात येऊन शंभर मोबाईल चोरून पुन्हा घरवापसी करत असल्याचेही प्राथमिक तपासातून समोर आले आहे. नऊ जणांच्या या टोळीकडून पहिल्या तपासात ३० मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. टोळीने पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात देखील गुन्हे केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
रोहन कुमार विलोप्रसाद चौरोसिया (वय १९), राजेश धर्मपाल नोनियाँ (वय १८), अमिर नुर शेख (वय १९), सचिन सुखदेव कुमार (वय २०), सुमित मुन्ना मात्थोकुमार (वय २१), कुणाल रामरतन महतो (वय २१), उजीर सलीम शेख (वय १९), दिनेश राजकुमार नोनिया (वय १८), अभिषेक राजकुमार महतो (वय २२, रा. सर्व झारखंड) अशी अटक केलेल्या नऊ जणांची नावे आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक दिलीप फुलफगारे, उपनिरीक्षक दिग्विजय चौगुले, आशिष पवार व त्यांच्या पथकाने केली आहे.
पुण्याचा गौरवशाली गणेशोत्सावात दरवर्षी हजारो मोबाईल चोरीला जातात. दहा दिवसांच्या कालावधीत तसेच विसर्जन मिरवणूकीत चोरटे अॅक्टीव्ह झालेले असतात. पोलिसांचा दगडा बंदोबस्त असताना देखील टोळ्यांकडून मोबाईलवर डल्ला मारला जातो. मात्र, टोळ्या काही सापडत नाहीत.
दरम्यान, खडकी पोलीस ठाण्याचे पथक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने बंदोबस्त करत होते. तेव्हा जुना पुणे-मुंबई महामार्गावरील रोडवर पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी दबा धरून बसली असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार, वरिष्ठ निरीक्षक दिलीप फुलफगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने या टोळीला जेरबंद केले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर ते मोबाईल चोरणारे अट्टल गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्यानूसार, त्यांना पकडून ३० मोबाईल जप्त केले.
गणेशोत्सवात चोऱ्या
झारखंडमधील हे तरुण मोबाईल चोर दर तीन ते चार महिन्यांनी पुण्यात मोबाईल चोरीसाठी येत असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक दिलीप फुलफगारे यांनी दिली. ते गणेशोत्सव काळात देखील पुण्यात आले होते. त्यांनी मोबाईल चोरी केल्याचे समजते. एकदा पुण्यात आल्यानंतर ते जवळपास १०० मोबाईल चोरूनच परतत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
झारखंडमध्ये मोबाईल शॉपी
गेल्या ६ दिवसांपुर्वी (दि. १० एप्रिल) टोळी पुण्यात आली होती. त्यांनी ६ दिवसात ३० मोबाईल चोरले. यातील अनेकांचे झारखंडमध्ये मोबाईल शॉपी दुकान चालवितात. चोरलेले मोबाईल ते तेथे नेहून विक्री करतात. तर, काही मोबाईल हे मुंबईत विक्री केली जात असल्याचे समजते.