शनिवारी सकाळी पुणे स्थानकावरुन राजापूरसाठी निघालेल्या एसटीचा चालक मद्यपान करुन गाडी चालवत असल्याची तक्रार प्रवाशानी सातारा बस स्थानकात नोंदवली. पुणे राजापूर बस सातारा स्थानकातच उभी करुन ठेवल्याने राजापूरकडे येणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहेत. दरम्यान सातारा बस स्थानकाच्या प्रशासनाने पुढील प्रवासासाठी हात झटकल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीद मिरवणाऱ्या एस टी महामंडळाच्या सेवेची लक्तरे वेशीवर आली आहेत.
राजापूर बस डेपोची असणारी ही बस शनिवारी सकाळी ९ वाजता पुणे स्थानकातून राजापूरकडे निघाली. मात्र या बसचा चालक मद्यपानाच्या नशेत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आल्याने प्रवाशांनी सदर बस सातारा स्थानकात थांबवुन त्याबाबत तक्रार केली. मात्र सातारा स्थानकाच्या प्रशासनाने याबाबत हात वर केल्याने काही महिला प्रवाशांना अक्षरश: रडु कोसळले. त्यानंतर राजापूरकडे येणाऱ्या एका महिला प्रवाशाने आपल्या राजापूर येथील नातेवाईकांना याबाबत माहिती दिल्याने त्यानी राजापूर बस डेपोशी संपर्क साधला. मात्र राजापूर बस डेपोच्या प्रशासनानेही उडवाउडवीची उत्तरे दिल्याची माहिती राजापूर गुरव वाडी येथील नागरिक सचिन गुरव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
काही दिवसांपुर्वी संगमेश्वर बस डेपोचा चालक अशाच प्रकारे मद्यपान करुन गाडीत चालवत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असला. तरी आठवडाभरात रत्नागिरी जिल्ह्यात घडलेली ही दुसरी घटना आहे. त्यामुळे आता कोणत्या विश्वासार्हतेवर एस टी महामंडळाच्या बसने प्रवास करावा? आता महामंडळाला प्रवाशांच्या जीवाचे काहीच सोयर सुतक नाही का? असे प्रश्न प्रवाशांमधून उपस्थित करण्यात येत आहेत. राजापूर डेपोच्या प्रशासनानेही याबाबत हात झटकल्याने राजापूरला येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास बिनभरोशी राहीला आहे.