फोटो सौजन्य - सोशल मीडिया
पुणे : पुण्याच्या राजकारणामध्ये मोठी खेळी होणार आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय समीकरणे बदलताना दिसणार आहे. यामध्ये वसंत मोरे यांचे नाव समोर आले आहे. सध्या वंचित बहुजन आघाडीमध्ये असणारे वसंत मोरे हे हे आज ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राज ठाकरेंना राम राम ठोकणारे वसंत मोरे हे आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत राजकारण करणार असल्याची चित्र सध्या दिसून येत आहे. त्यामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा सुरु आहे.
पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी अनेक वर्षे राज ठाकरेंसोबत काम केले. मात्र मनसेकडून खासदारकीची संधी न देण्यात आल्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी वसंत मोरे यांनी मनसेचे साथ सोडली. यामुळे मनसेला पुण्यामध्ये मोठा धक्का बसला. त्यानंतर महाविकास आघाडीसोबत त्यावेळी देखील वसंत मोरे यांनी चर्चा केली होती. मात्र खासदारकीसाठी उत्सुक असलेल्या वसंत मोरे यांची बोलणी तेव्हा फसली. त्यामुळे वसंत मोरे यांनी निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पुण्याची लोकसभा निवडणुक तिरंगी झाली.ॉ
ठाकरे गटात प्रवेश करण्यासाठी उत्सुक
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून वसंत मोरे यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. मात्र यामध्ये त्यांचा दारुण पराभव झाला. त्यामुळे वसंत मोरे यांचे राजकीय करिअर याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. त्यामध्ये आता पुन्हा एकदा वसंत मोरे यांनी राजकीय खेळी खेळली आहे. आज दुपारी वसंत मोरे व उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट होणार आहे. वसंत मोरे हे ठाकरे गटामध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत. या पक्षप्रवेशाच्या दृष्टीकोनातूनच वसंत मोरे व उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत.
लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडी यांची देखील बोलणी बिघडल्यामुळे त्यांची युती होवू शकली नाही. वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र निवडणूक लढण्याचा विचार जाहीर केला नंतर पुण्यातील जागेसाठी त्यांनी वसंत मोरे यांना पसंती दाखवली. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून वसंत मोरे यांनी निवडणूक लढवली. मात्र त्यांना अपेक्षित असे यश आले नाही. लोकसभा निवडणुकीनंतर वसंत मोरे यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहेय. त्यामुळे मोरे हे लवकरच ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगल्या आहेत.