बारामती हत्याकांड (फोटो- istockphoto)
बारामती: शहरातील प्रगतीनगर याठिकाणी अनिकेत सदाशिव गजाकस(वय २३) या युवकाचा कोयत्याने वार करुन निर्घृण खून केल्याप्रकरणातील तिघांना १२ तासाच्या आत पोलीसांनी सोलापूर जिल्ह्यातील खंडाळी (ता. माळशिरस) येथून पाठलाग करुन जेरबंद केले. १९ डिसेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास अनिकेत गजाकस हा बारामती मधील प्रगतीनगर क्रियेटिव्ह अॅकॅडमीकडून टिसी कॉलेजकडे जाणारे रोडवरुन जात असताना संशयीत आरोपी नंदकिशोर पंजाबराव अंभोरे (वय १९ रा शेळकेवस्ती, तांदुळवाडी, बारामती ), महेश नंदकुमार खंडाळे (वय २१, रा यदुपाटीलनगर तांदुळवाडी, बारामती), संग्राम दत्तात्रय खंडाळे (वय २१, रा शेळकेवस्ती तांदुळवाडी, बारामती) यांनी मोटारसायकल वर येवून अनिकेचा नंदकिशोर अंभोरे याच्या आते बहिणीसोबत बोलण्याच्या कारणावरुन कोयत्याने वार करुन खून केला.
याबाबत अभिषेक सदाशिव गजाकस यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास करून फरार झालेल्या संशयित आरोपींनी सोलापुर जिल्हयातील अकलुज खंडाळी येथुन २० डिसेंबर रोजी अटक केली. त्यादरम्यान आरोपींकडून गुन्हयात वापरेलेली मोटार सायकल जप्त केली.
पोलीस पथकातील पाच जणांना पारितोषिक
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार , दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस, स्थानिक गुन्हे शाखेचे अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदिप संकपाळ व टिम बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सतीश राऊत व त्यांची टिम यांनी सदर गुन्हयात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गुन्हयाचा पुढील अधिक तपास सपोनि गजानन चेके करत आहेत. दरम्यान या पथकातील पाच जणांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी सांगितले.
हेही वाचा: Baramati Crime: ‘आपल्या नात्यातील मुलीकडे पाहतो म्हणून…’; 19 वर्षीय युवकासोबत घडली हृदयद्रावक घटना
कोयता विकणाऱ्यावरही करवाई
या घटनेत आरोपींनी ज्या व्यक्तीकडून कोयता विकत घेतला होता, त्या व्यक्तीची देखील चौकशी केली जाणार असल्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक बिरादार यांनी सांगितले.
प्रकरण काय?
आपल्या नात्यातील एका मुलीकडे पाहतो व तिच्याशी सतत बोलतो या कारणावरून एका १९ वर्षीय युवकाचा बारामती शहरातील प्रगतीनगर याठिकाणी गुरुवारी (ता. १९) रात्री कोयत्याने वार करून खून करण्यात आला. या घटनेने बारामती हादरली आहे. अनिकेत सदाशिव गजाकस (रा. देसाई इस्टेट,बारामती) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून हा युवक बारामती नगर पालिकेच्या घंटा गाडीवर चालक म्हणून काम करत होता.
या प्रकरणी त्याचा भाऊ अभिषेक सदाशिव गजाकस यांनी शहर पोलिसात फिर्यादी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलिसांनी नंदकिशोर पंजाबराव अंभोरे (रा. प्रगती नगर, बारामती), महेश नंदकुमार खंडाळे (रा. तांदुळवाडी रोड, जिजामाता नगर, बारामती) व संग्राम खंडाळे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.