बारामतीमध्ये युवकांची हत्या (फोटो- istockphoto)
बारामती: आपल्या नात्यातील एका मुलीकडे पाहतो व तिच्याशी सतत बोलतो या कारणावरून एका १९ वर्षीय युवकाचा बारामती शहरातील प्रगतीनगर याठिकाणी गुरुवारी (ता. १९) रात्री कोयत्याने वार करून खून करण्यात आला. या घटनेने बारामती हादरली आहे. अनिकेत सदाशिव गजाकस (रा. देसाई इस्टेट,बारामती) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून हा युवक बारामती नगर पालिकेच्या घंटा गाडीवर चालक म्हणून काम करत होता.
या प्रकरणी त्याचा भाऊ अभिषेक सदाशिव गजाकस यांनी शहर पोलिसात फिर्यादी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलिसांनी नंदकिशोर पंजाबराव अंभोरे (रा. प्रगती नगर, बारामती), महेश नंदकुमार खंडाळे (रा. तांदुळवाडी रोड, जिजामाता नगर, बारामती) व संग्राम खंडाळे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
गुरुवारी रात्री बारामती शहरातील प्रगती नगर परिसरात साडेदहा वाजण्याच्या सुमारास अनिकेत गजाकस याच्यावर तीन अज्ञात युवकांनी कोयत्याने हल्ला करून त्याला जखमी केले. त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान हे तिघे संशयित पसार झाले असून त्यांना ताब्यात घेण्यासाठी तीन पोलिस पथके रवाना झाली असल्याचे पोलिस निरिक्षक विलास नाळे यांनी सांगितले.
या घटनेनंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. आरोपीच्या मावस बहिणीशी सतत बोलतो, या कारणावरून अनिकेत याचा तिघांनी खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. अनिकेत चे वडील रिक्षा चालवतात, त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी या भागापासून जवळच असणाऱ्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या आवारात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अशाच पद्धतीने खून झाला होता. ही घटना ताजी असताना पुन्हा याच परिसरात निर्घृण खून झाल्याने मोठी बारामती शहरात पुन्हा भीतीचे 5वातावरण तयार झाले आहे.
पुणे हादरलं! कामाचे पैसे मागितल्याने दोघांवर कोयत्याने हल्ला
कामाचे पैसे मागितल्याने झालेल्या वादातून दोघांवर कोयत्याने वार करून त्यांच्या खूनाचा प्रयत्न केल्याची घटना लोहगाव भागात घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे. रोहित प्रकाश पारख (वय २९, रा. वडगाव शेरी), अक्षय पाटोळे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी कल्पेश फकीरचंद रंगारी (वय ४२, रा. फाॅरेस्ट पार्क सोसायटी, लोहगाव) याला अटक केली आहे. याबाबत रोहित पारख यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
हेही वाचा: पुणे हादरलं! कामाचे पैसे मागितल्याने दोघांवर कोयत्याने हल्ला; सपासप वार केले अन्…
पोलिसांच्या माहितीनुसार, पारख आणि त्याचा मित्र पाटोळेने रंगारी यांचे काम केले होते. कामाचे पैसे मागितल्याने रंगारी आणि पारख यांच्यात वाद झाला. पारख आणि पाटोळे रंगारी याच्याकडे कामाचे पैसे मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी रंगारीने पारख यांना शिवीगाळ केली. रंगारीने घरातून कोयता आणला. त्याने पारख यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यावेळी पाटोळेने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी पाटोळे यांच्यावरही कोयत्याने वार केले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे तपास करत आहेत.