सचिन सावंत यांची भाजपवर टीका (फोटो- ट्विटर)
पुणे: केंद्रांमध्ये व नंतर राज्यातही भारतीय जनता पक्षाचीच सलग १० वर्षे सत्ता आहे, तरीही हिंदू खतरेमें कसे काय, असा प्रश्न करत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी पराभवाच्या भीतीने भारतीय जनता पक्ष आता हिंदु-मुस्लिम करत मतांचे धुव्रीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. महाविकास आघाडीतील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ सावंत यांची काँग्रेस भवनमध्ये शनिवारी पत्रकार परिषद झाली. यावेळेस सचिन सावंत म्हणाले, लोकसभेचे संविधान बदलाचे वातवरण बदलले आहे, असे भाजप स्वत:च सांगत आहे.
मात्र इतक्या दिवसांच्या प्रचारात तसे काहीही झालेले नाही हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळेच आता मतांचे धर्मयुद्धसारख्या गोष्टी देवेंद्र फडणवीस करत आहेत. बटेंगे तो कटेंगे असे पंतप्रधान म्हणत आहेत. भाजपच्या सर्वांनीच त्यांच्या पक्षाची घटना वाचून पहावी. त्यात स्पष्टपणे धर्मनिरपेक्ष विचारसरणीवर विश्वास व महात्मा गांधी यांना आदर्श मानून असे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस घटनात्मक पदावर आहेत. ते पद स्वीकारताना त्यांनी घटनेची शपथ घेतली. त्याला विसंगत असे ते वागत आहेत.
मतांचे धर्मयुद्ध यातील धर्मयुद्ध या शब्दाला आक्षेप घेत सावंत म्हणाले, कौरव पांडव यांच्यात झाले ते धर्मयुद्ध होते. त्यात दोन्ही पक्ष सनातनी हिंदूच होते. याचा अर्थ धर्मयुद्ध हा शब्द नीती-अनीती या अर्थाने वापरण्यात आला. फडणवीस मात्र तो हिंदू-मुस्लिम या अर्थाने वापरत आहेत. ते घटनेच्या विरोधी आहे. आम्ही याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. त्याशिवाय आता दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमध्ये मधूनच एखादा रस्ता दाखवत त्यावर लाडकी बहीण योजनेचा फलक दाखवतात. तीच मालिका ओटीटीवर दाखवताना त्यात मात्र फलक नसतो. आचारसंहितेपासून पळवाट काढण्यासाठी भाजप हे करत असल्याची टीका सावंत यांनी केली.
‘बटेंगे तो कटेंगे’- योगी आदित्यनाथ
‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारा देत योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांचा समाचार घेतला. योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, महाराष्ट्र ही संत, महापुरुषांची पुण्यभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना एकत्रित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. भारतासाठी ते सदैव प्रेरणादायी आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य बाळगंगाधर टिळक, बाजीराव पेशवे यांनी आदर्श घडवला. त्यांच्या प्रेरणेतून देश व समाजासाठी कार्य केले जात आहे.
हेही वाचा: आपली लढाई महाविकास नव्हे तर महाअडाणी आघाडी विरोधात ! योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
आपली लढाई महाविकास नव्हे तर महाअडाणी आघाडी विरोधात
आपली लढाई महाविकास नव्हे तर महाअडाणी आघाडी विरोधात आहे. ते लव जिहाद, लँड जिहाद सारख्या प्रकाराला प्रोत्साहन देतात. त्यामुळे चुकूनही त्यांचा विचार करू नका. अन्यथा आपले सण गणेशोत्सव, रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक होईल. निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत विभागले जाऊ नका, असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आता नवीन भारताच्या सीमा सुरक्षित आहे. ५०० वर्षांत जे कार्य झाले नाही, ते नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अयोध्यामध्ये भव्य राम मंदिर उभारून झाले. हा डबल इंजिन सरकारचा लाभ आहे. सर्व समस्यांचे समाधान केवळ डबल इंजिन सरकार असू शकते, असे देखील ते म्हणाले.