(फोटो - istockphoto)
पुणे: सिंहगड रस्ता परिसरात आतापर्यंत ५ जणांचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे. उशिरा का होईना शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी शासनाने पावले उचलल्याने जीव गेल्यावर सरकार हलल्याची प्रचिती येत आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे सिंहगड रस्ता परिसरातील पाच ते सहा गावांमध्ये गुलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) आजाराची साथ पसरली.
त्यामुळे या गावांना होणार्या अशुध्द पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री अजित पवार यांनी सिंहगड रस्ता परिसरातील समाविष्ट गावांना शुध्द पाणीपुरवठा करण्यासाठी ५०० कोटी रुपये खर्चाच्या योजनेला मंजुरी दिल्याचे जाहीर केले आहे. या योजनेनुसार राज्य शासन व महापालिका प्रत्येकी ५० टक्के खर्च करणार आहे.
दरम्यान, पालकमंत्री पवार यांच्या घोषनेनंतर महापालिकेने तत्काळ समाविष्ट १२ गावांच्या पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला आहे. त्यानुसार संबंधित १२ गावांची लोकसंख्या आणि पाण्याची मागणी यानुसार ८९० कोटींचा योजना आराखडा तयार केला आहे.
महापालिकेने १२ गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी केलेल्या प्रकल्प आराखड्यानुसार खडकवासला धरणाच्या पायथ्याशी १०० एमएलडीचे प्रत्येकी दोन जलशुद्धीकरण केंद्र, पंपहाऊस व जॅकवेल बांधण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शुद्ध व अशुद्ध पंपिंग मशिन तसेच मुख्य जलवाहिन्या व वितरण वाहिन्या टाकण्यात येणार आहेत.
जलशुद्धीकरण केंद्रासह जॅकवेल, पंपहाऊससाठी ११ एकर जागेची आवश्यकता लागणार आहे. या भागात पाटबंधारे विभागाची जागा असून, महापालिकेने त्या जागेची मागणी केली आहे. तसेच ५ पंप हाऊस व ४२ टाक्यांच्या जागांपैकी टप्पा १ मध्ये ५ पंपहाऊस व ३३ टाक्यांचा समावेश आहे. उर्वरित ९ टाक्या टप्पा २ मध्ये आहेत. त्यासाठी महापालिकेकडे २० जागा उपलब्ध असून, १८ जागांसाठी टप्पा १ मध्ये भूसंपादन करण्यात येणार आहे. दरम्यान, टप्पा एक मध्ये भूसंपादन व देखभाल दुरुस्तीची कामे वगळून उर्वरित आवश्यक कामांसाठी ६०६ कोटी लागणार आहेत, तर टप्पा दोनमध्ये २८४ कोटींची आवश्यकता लागणार आहे.
योजनेतील १२ गावांची २०२४ पर्यंतची अंदाजित लोकसंख्या ३ लाख ४८ हजार ५५८ इतकी आहे. त्यासाठी ६६.१० एमएलडी इतकी पाण्याची मागणी आहे. या गावांची २०२५ पर्यंतची अंदाजित लोकसंख्या ७ लाख ६० हजार ६६३ इतकी असेल, त्यासाठी १५१.७ एमएलडी इतकी पाण्याची आवश्यकता असेल.
महापालिकेत समाविष्ट १२ गावांना शुद्ध पाणीपुरवठ्याची योजना राबविण्यासाठी ६०६ कोटींच्या योजनेचा प्रस्ताव नुकताच राज्य शासनाला पाठविला आहे. राज्य शासन व महापालिका प्रत्येकी ५० टक्के याप्रमाणे खर्चाचा प्रस्ताव आहे. शासनाच्या अंतिम मंजुरीनंतर प्रत्यक्ष योजनेच्या कामाला सुरुवात होईल.
– नंदकिशोर जगताप, पाणीपुरवठा, विभागप्रमुख, पुणे मनपा
‘या’ गावांना मिळणार शुद्ध पाणी
धायरी, नांदोशी, किरकटवाडी, खडकवासला, सणसनगर, नांदेड, नर्हे, कोळेवाडी, जांभूळवाडी, भिलारवाडी, मांगडेवाडी