अजित पवार आणि शरद पवार दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे काकडे यांचे वक्तव्य (फोटो - सोशल मीडिया)
अजित पवार यांच्या मृत्यूमुळे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपदाची जागा रिक्त झाली आहे. त्याचबरोबर अजित पवार यांच्याकडे उत्पादन शुल्क आणि क्रीडा खात्याचा देखील कारभार होता. तसेच ते राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील होते. अजित पवार यांच्या जागेवर यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच पवार कुटुंबिय एकत्र येऊन दोन्ही राष्ट्रवादी देखील एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी पक्षाचे काय भविष्य असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अजित पवार असतानाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या.या संदर्भात निर्णय देखील झाला होता आणि तारीख देखील ठरली होती असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी केला आहे.
हे देखील वाचा : कोण सांभाळणार उपमुख्यमंत्रिपदाची धुरा? प्रफुल्ल पटेल अन् छगन भुजबळांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
एका वृत्तवाहिनीशी राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या मात्र त्यापूर्वीच अजित पवारांचे दुखःद निधन झाले असल्याचे सांगितले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अंकुश काकडे म्हणाले की, राजाकराणामध्ये माझी आणि अजित पवार यांची सुरुवात एकाच वेळी झाली होती. दोन्ही जिल्हा बँकेमध्ये निवडून आलो होतो. आम्ही राजकारणामध्ये अनेक वर्षे काम केले आहे. दादा हे आमचे नेहमी नेते राहिले आहेत. पवार साहेबांचा राजकीय वारसा घेऊन त्यांनी काम केले हे महाराष्ट्र कधीही विसरणार नाही, असे मत अंकुश चौधरी यांनी व्यक्त केले.
पुढे ते म्हणाले की, “मला राहून राहून याचं दुःख होतंय की अखेरच्या क्षणाला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी असा आग्रह अजित पवारांनी केला होता. विठ्ठल शेठ,माणियार, श्रीनिवास पाटील आणि शरद पवारांचे नाते जवळचे आहे. दोन्ही राष्ट्रवादी कशा एकत्र येतील यासाठी प्रयत्न करा. आम्हाला जे करता येईल ते आम्ही करत होतो. आम्ही पूर्ण प्रयत्न करत होतो. पण दुर्दैवाने यश आले नाही,” अशी खंत अकुंश काकडे यांनी व्यक्त केली.
हे देखील वाचा : “तुमच्याविषयी देखील माझी तक्रार..; Rohit Pawar यांचे अजित पवारांना भावनिक पत्र, वाचून येईल डोळ्यात पाणी
पुढे अंकुश काकडे म्हणाले की, “महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला. हा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाल्याने तो पुण्यातही झाला. मात्र आमचे शहराध्यक्ष सोडून गेल्यामुळे आमची थोडी पंचायत झाली. अजित पवारांशी चर्चा करताना आमच्या बऱ्याच वाटाघाटी झाल्या होत्या. दोन्ही राष्ट्रवादी 12 डिसेंबरला एकत्र येणार होतो. पण येऊ शकलो नाही. ठीक आहे. निवडणुकीनंतर एकत्र येऊ असंही अजित पवार म्हणाले” असल्याचे अंकुश काकडे म्हणाले आहेत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता
राज्यामध्ये झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र लढले होते. मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांना अपेक्षित असे यश मिळाले नाही. यानंतर देखील शरद पवार यांची भेट घेऊन अजित पवार यांनी जिल्हा पंचायत आणि पंचायत समितीची निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे दोन्ही गटातील राजकीय मतभेद कमी होत असल्याचे देखील बोलले जात होते. मात्र प्रत्यक्ष एकत्र येण्यापूर्वीच अजित पवार यांच्याबाबत नियतीने क्रूर निर्णय घेतला.






