श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांचे सर्च ऑपरेशन (फोटो- ट्विटर)
बारामती: महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. कालच प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. प्रचारादरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अनेक सभा, मुलाखती घेऊन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. तर लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेत देखील बारामती मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. दरम्यान मतदानाच्या एक दिवस आधी बारामतीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. युगेंद्र पवारांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या शरयू मोटर्समध्ये निवडणूक आयोगाने पोलिसांच्या मदतीने सर्च ऑपरेशन केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
यंदा बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होणार आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात उभी फुट पडल्यानंतर पवार घराण्यात दुसऱ्यांदा अशी लढत होत आहे. त्यामुळे बारामतीच्या लढतीला महत्व प्राप्त झाले आहे. काल बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची सांगता सभा पार पडली. दोन्ही बाजूने एकमेकांवर बोलले गेले. अजित पवारांनी आपल्या सभेतून केलेल्या व पुढे करणार असणाऱ्या विकासकामांचा लेखाजोखाच मांडला आहे.
दरम्यान निवडणुकीआधी बारामतीमध्ये मोठी घडामोड घडली आहे. युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या शरयू मोटर्समध्ये निवडणूक आयोगाने सर्च ऑपरेशन केले आहे. पैसे वाटपाच्या तक्रारीवरून हे सर्च ऑपरेशन राबवण्यात आले आहे. त्यामुळे बारामतीमध्ये एकच चर्चा रंगली आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने पोलिसांच्या मदतीने हे सर्च ऑपरेशन राबवले. मात्र यामध्ये काही आढळून आले नाही. मात्र यामुळे आता राजकारण चांगलेच तापले आहे.
हेही वाचा: “काम असं करायचं की त्याचा मला आणि …”; सांगता सभेतून अजित पवारांची बारामतीकरांना भावनिक साद
कालच्या सभेत अजित पवार काय म्हणाले?
गेले दोन ते तीन महीने मी संपूर्ण राज्यभर फिरत आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी यांनी जनतेसाठी अनेक योजना आणल्या आहेत. लाडकी बहीण योजना, मुलीना शिक्षण मोफत केले. यासाठी राज्याच्या बजेटमध्ये तरतूद केली. विरोधकांनी यावर खूप टीका केली. १९९१ पासून आतापर्यंत विकासाच्या बाबतीत मागे वळून पाहिले नाही. पाच वर्षांमध्ये करोंना आणि विरोधी पक्षात असताना देखील बारामतीचा बस डेपो केला. शिवसृष्टीचे काम सुरू आहे. पालखी महामार्ग चांगला केला. मेडिकल कॉलेज चांगले केले. अजून अनेक कामे राहिली आहेत. त्यासाठी फक्त तुम्हाला २० तारखेला पहिल्या नंबरचे घडल्याचे बटण दाबावे लागणार आहे. ते तुम्ही दाबले की मी तुमचे काम केलेच.
कालच्या सभेत शरद पवार काय म्हणाले?
लोकसभा निवणुकीची शेवटची सभा आपण तुमच्या उपस्थितीत बारामतीत घेतली होती. लोकसभा निवडणुकीच्या निकालातून आपण विरोधकांना महाराष्ट्र काय चीज आहे हे दाखवून दिलं. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान. त्यांची काय इच्छा होती ते माहिती नाही. संविधानात मोठे बदल करण्यासाठी त्यांनी 300 खासदार निवडून देण्याचा नारा दिला होता. पण लोकसभा निवडणुकीत सुप्रिया ताईना मोठ्या मतांनी विजयी केलं. महाराष्ट्रात एकूण 48 खासदारांपैकी 30 खासदार निवडून दिले आणि मोदींना आवर घालण्याची तुम्ही सुरूवात केली.