अजित पवारांची बरांटीमध्ये प्रचारसभा (फोटो- यूट्यूब )
बारामती: आज राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीने राज्यभरात अनेक प्रचारसभा घेतल्या. दरम्यान लोकसभेप्रमाणेच यंदा विधानसभा निवडणुकीत देखील सर्वांचे लक्ष बारामती विधानसभा मतदारसंघाकडे लागले आहे. आज उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी बारामतीमध्ये सांगता सभा घेतली. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे. बारामतीच्या सभेत अजित पवार नेमके काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
बारामतीच्या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले , “गेले दोन ते तीन महीने मी संपूर्ण राज्यभर फिरत आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी यांनी जनतेसाठी अनेक योजना आणल्या आहेत. लाडकी बहीण योजना, मुलीना शिक्षण मोफत केले. यासाठी राज्याच्या बजेटमध्ये तरतूद केली. विरोधकांनी यावर खूप टीका केली. १९९१ पासून आतापर्यंत विकासाच्या बाबतीत मागे वळून पाहिले नाही.”
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, “पाच वर्षांमध्ये करोंना आणि विरोधी पक्षात असताना देखील बारामतीचा बस डेपो केला. शिवसृष्टीचे काम सुरू आहे. पालखी महामार्ग चांगला केला. मेडिकल कॉलेज चांगले केले. अजून अनेक कामे राहिली आहेत. त्यासाठी फक्त तुम्हाला २० तारखेला पहिल्या नंबरचे घडल्याचे बटण दाबावे लागणार आहे. ते तुम्ही दाबले की मी तुमचे काम केलेच.”
“ज्या गोष्टी करायच्या त्यामध्ये मलाही अभिमान वाटला पाहिजे आणि आमच्या आमदारांनी काम केले याचा बारामतीकरांना देखील अभिमान वाटला पाहिजे. मी कामाचा माणूस आहे, बिनकामाचा माणूस नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये भावनिक होऊ नका. बारामतीमध्ये गुंडगिरी, दहशत ही चालून देणार नाही. कोणाचे लाड करणार नाही. कोणी काही केल्यास त्याला तडीपार करायचं किंवा मोक्का लावायचा, असे अजित पवार म्हणाले.
“मी राज्यात सर्वत्र फिरलो. जवळपास आजची माझी ५७ वी सभा आहे. ५८ जागांमध्ये मी २० टक्के ओबीसी उमेदवार दिले. १२ टक्के जागा एसटी वर्गाला दिल्या. मागासवर्गीय उमेदवार दिले. सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. मी निवडून येणाऱ्या जागा दिल्या आहेत. कारण आम्ही सर्वांचा विचार करणारे आहोत. गटतट बाजूला ठेव. ही भावकीची नाही तर राज्याची भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे.
अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा दणका
बारामतीमध्ये देखील चुरशीची लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदाची विधानसभा निवडणूक देखील पवार कुटुंबामध्ये होणार आहे. अजित पवार यांच्याविरोधात शरद पवार यांनी अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट अनेक मतदारसंघामध्ये आव्हान देत आहेत. अजित पवार यांच्याकडून जोरदार प्रचार केला जात आहे. निवडणूक आयोगाकडून अजित पवार यांना घड्याळ चिन्ह व राष्ट्रवादी हे नाव देण्यात आले असले तरी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगण्याचे निर्देश देण्यात आले आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर आणखी एक सूचना अजित पवार गटाला सुप्रीम कोर्टाने दिली आहे.