ग्रामीण साहित्याला शहरातील वाचकांचा वाढता प्रतिसाद (फोटो- ai gemini )
ग्रामीण साहित्याला शहरातील वाचकांचा वाढता प्रतिसाद
पुण्यात नव्या वाचकवर्गाची निर्मिती
मराठी साहित्यात ग्रामीण साहित्याचा स्वतंत्र आणि समृद्ध प्रवाह
पुणे/गायत्री पवळे: मराठी साहित्यात ग्रामीण साहित्याचा स्वतंत्र आणि समृद्ध प्रवाह आहे. शेतकरी, दुष्काळ, स्थलांतर, ग्रामीण संस्कृती, लोकपरंपरा आणि गावाकडच्या बदलत्या सामाजिक वास्तवाचे चित्रण करणाऱ्या साहित्याला आता केवळ ग्रामीण भागापुरताच मर्यादित प्रतिसाद मिळत नाही. पुण्यासारख्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक शहरातही ग्रामीण साहित्य वाचणारा आणि त्यावर चर्चा करणारा वाचकवर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे.
पुण्यातील प्रमुख पुस्तक प्रदर्शन, साहित्य संमेलने, पुस्तक महोत्सव तसेच विविध ग्रंथदालनांमध्ये ग्रामीण कादंबऱ्या, कथासंग्रह आणि आत्मकथनांची मागणी वाढत असल्याचे पुस्तक विक्रेते सांगतात. विशेषतः तरुण अभ्यासक, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, संशोधक आणि ग्रामीण पार्श्वभूमीतून पुण्यात शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी या साहित्याचे नियमित वाचक आहेत. ग्रामीण जीवन समजून घेण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या सामाजिक वास्तवाचा अभ्यास करण्यासाठीही हे साहित्य उपयुक्त ठरत असल्याचे साहित्य अभ्यासकांचे मत आहे.
पुण्यात आयोजित होणाऱ्या साहित्यिक चर्चासत्रांमध्ये आनंद यादव, रा. रं. बोराडे, विश्वास पाटील, सदानंद देशमुख, इंद्रजित भालेराव, आसाराम लोमटे यांसारख्या लेखकांच्या साहित्यावर चर्चा होत असल्याचेही दिसून येते. ग्रामीण कथांमधील वास्तववादी मांडणी आणि भाषेतील अस्सलपणा हा शहरातील वाचकांना आकर्षित करणारा महत्त्वाचा घटक ठरत आहे.
जया किशोरींच्या ‘इट्स ओके’ पुस्तकातून तणावमुक्त आयुष्याची सकारात्मक दिशा
दुसरीकडे, ग्रामीण भागात ग्रामीण साहित्याला मिळणारा प्रतिसाद अधिक भावनिक आणि अनुभवाधारित असतो. गावातील वाचकांना या साहित्यामध्ये स्वतःचे जीवन, संघर्ष, शेती, नाती आणि परंपरा प्रतिबिंबित झाल्याची भावना निर्माण होते. अनेक ठिकाणी सार्वजनिक वाचनालये, ग्रामीण साहित्य संमेलने, शाळा-महाविद्यालयांतील वाचन मंडळे आणि स्थानिक सांस्कृतिक संस्थांमधून अशा साहित्याचे सामूहिक वाचन आणि चर्चा आयोजित केल्या जातात. त्यामुळे ग्रामीण साहित्य हे तेथील सामाजिक संवादाचेही महत्त्वाचे माध्यम बनले आहे.
तज्ज्ञांच्या मते, शहरातील वाचक ग्रामीण साहित्याकडे अभ्यास, सामाजिक जाण आणि वास्तव समजून घेण्याच्या दृष्टीने पाहतात; तर ग्रामीण वाचक त्याच साहित्याशी भावनिक नाते जोडतात. त्यामुळे दोन्ही ठिकाणचा प्रतिसाद वेगळा असला तरी साहित्याविषयीची उत्सुकता कायम आहे.
डिजिटल माध्यमांमुळेही ग्रामीण साहित्य नव्या वाचकांपर्यंत पोहोचत आहे. ऑनलाइन पुस्तक विक्री, ई-पुस्तके, लेखकांच्या मुलाखती, पुस्तक परीक्षणे आणि सोशल मीडियावरील साहित्य चर्चा यामुळे पुण्यासह शहरी भागातील तरुण वाचक ग्रामीण साहित्याकडे वळताना दिसत आहेत.
साहित्य अभ्यासकांच्या मते, ग्रामीण आणि शहरी अनुभवांमधील दरी कमी करण्याचे प्रभावी माध्यम म्हणून ग्रामीण साहित्य महत्त्वाची भूमिका बजावत आहे. बदलत्या वाचन संस्कृतीतही या साहित्याची उपयुक्तता आणि सामाजिक संदर्भ कायम असल्याने पुण्यासारख्या शहरात त्याचा वाचकवर्ग हळूहळू विस्तारत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
पुस्तक परीक्षण : भयग्रस्त काळातील कवितांचे संकलन
शहरी भागात ग्रामीण साहित्य मोठ्या प्रमाणात वाचले जात आहे. नव्या पिढीला आपल्या मूळ संस्कृतीचा, जीवनपद्धतीचा आणि सामाजिक वास्तवाचा शोध घ्यायचा आहे. त्यामुळे ते पुस्तके, डिजिटल माध्यमे आणि ऑडिओ स्वरूपातूनही ग्रामीण साहित्याकडे वळत आहेत. ग्रामीण साहित्यामधील अस्सल भाषा, बोली आणि अनुभव त्यांना आकर्षित करत आहेत. दुसरीकडे, ग्रामीण भागातही वाचन कमी झालेले नाही. तेथील वाचक नव्या साहित्याच्या शोधात आहेत. त्यामुळे साहित्याचे वाचन घटले आहे, हा केवळ गैरसमज असून ग्रामीण साहित्याचा वाचकवर्ग आजही सक्षम आणि सक्रिय आहे.”






