डॉ . कुमार सप्तर्षी यांचे निधन (फोटो- सोशल मिडिया)
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, डॉ. सप्तर्षी समाजाला दिशा देणारे विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते आणि परिवर्तनवादी चळवळीचे प्रेरणास्थान होते. ग्रामीण परिवर्तन, सामाजिक न्याय, लोकशाही मूल्यांचे संवर्धन आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि तरुणांच्या मनात परिवर्तनाची ज्योत प्रज्वलित करण्याचे मोठे कार्य केले. समाजातील अन्यायाविरुद्ध संघर्ष करताना त्यांनी नेहमीच सत्य, अहिंसा आणि लोकशाही मूल्यांचा आग्रह धरला. त्यांच्या विचारांनी आणि कार्याने असंख्य कार्यकर्त्यांना सामाजिक बांधिलकीची प्रेरणा दिली.
डॉ. सप्तर्षी यांच्या निधनाने ग्रामीण विकास, शिक्षण, सामाजिक न्याय आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीची मोठी हानी झाली आहे. त्यांनी उभा केलेला वैचारिक वारसा आणि संघर्षाचा मार्ग पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. आम्ही डॉ . सप्तर्षी परिवारासह, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी आहोत, असे नमूद करुन मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ विचारवंत, गांधीवादी नेते डॉ कुमार सप्तर्षी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Dr. Kumar Saptarshi: ‘युक्रांद’चे संस्थापक, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षींचे निधन
रोहित पवारांनी वाहिली श्रद्धांजली
ज्येष्ठ समाजवादी नेते, पुरोगामी विचारवंत, ‘युवक क्रांती दला’चे (युक्रांद) संस्थापक आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. डॉ. कुमार सप्तर्षी हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पुरोगामी विचारवंत होते. लोकशाही मूल्यांचा आग्रह धरत असतानाच सामाजिक न्यायाच्या लढ्यात ते कायम अग्रेसर असत. आज समाज एका विचित्र परिस्थितीतून मार्गक्रमण करत असताना, द्वेष, हिंसा, आर्थिक विषमता यासारख्या प्रवृत्ती बळावत असताना ग्रामीण विकासाचा, मानवतेचा आणि गांधीवादाचा विचार घेऊन चालणारे डॉ. कुमार सप्तर्षी सरांसारखे व्यक्तिमत्व आपल्यातून जाणे ही मोठी हानी आहे.
विधानपरिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी सभागृहात उमटवलेली छाप आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून रस्त्यावर केलेला संघर्ष कायम स्मरणात राहील. त्यांच्या माध्यमातून गांधी विचारांचा एक सच्चा पाईक आपल्यातून निघून गेला. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!






