राज्यात पाऊस कोसळणार (फोटो- ai gemini )
पावसाने पुन्हा एकदा पुणे शहरात हजेरी लावली
शुक्रवारी कोसळल्या हलक्या स्वरूपाच्या सरी
कमाल तापमानातही वाढ झाल्याने नागरिक हैराण
पुणे: गेल्या दहा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा पुणे शहरात हजेरी लावली आहे. शहराच्या उपनगरांसह विविध भागांत शनिवारी हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला असून, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पुढील काही दिवस शहरात हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविली आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसानंतर शहरात पावसाने अचानक दडी मारली होती. कमाल तापमानातही वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र, शुक्रवारी सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर उपनगरांमध्ये हलक्या सरी कोसळल्या. दिवसभर आकाश ढगाळ राहिल्याने तापमानात किंचित घट झाली. शनिवारी शहरातील कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारी (ता. १९) शहरातील कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. सकाळी आकाश अंशतः ढगाळ राहून अतिशय हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. सोमवारपासून (ता. २०) तापमानात किंचित घट होऊन हलक्या पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
दरम्यान राज्यात देखील विविध भागात पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. तसेच नवी मुंबईत देखील मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. हवामान विभागाने रविवारी अनेक ठिकाण पावसाचा इशारा दिला आहे.
रेकॉर्डब्रेक पावसाचा माथेरानला फटका
रेकॉर्डब्रेक पावसानंतर माथेरानचे रस्ते उखडले असून त्या सर्व रस्त्यांची माथेरान नगरपरिषदेचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी पाहणी केली. त्यानंतर नगरपरिषद बांधकाम विभाग यांच्याकडून रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी मोजमाप देखील घेतली आहे.दरम्याना शहरातील सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत.
Maharashtra Rain Alert: कुणी तरी येणार गं! पुण्यात पावसाच्या हलक्या सरी कायम; पुढील चार दिवस…
गेल्या आठवड्यात माथेरानमध्ये झालेल्या रेकॉर्डब्रेक पावसामुळे शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. विशेषतः शारलोट लेक, इको पॉईंट, सनसेट पॉईंट आणि इतर प्रमुख पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्ते खराब झाल्याने पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना चालताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर माथेरान नगरपरिषदेचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली.






