Honoring Of Circle Division And Sub Division Heads For Outstanding Performance In Mahavitaran 2025 26
निकोप स्पर्धेमुळेच पुणे परिमंडलाची कामगिरी झळकली; डॉ. भूजंग खंदारे यांच्याकडून कौतुक
महावितरण पुणे परिमंडलाने सरत्या आर्थिक वर्षात २ हजार १६५ कोटी रुपये वसुली करुन उत्तम कामगिरी केली आहे. मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी विभाग व उपविभागामध्ये वसुलीसाठी लावलेल्या निकोप स्पर्धेमुळेच हे शक्य झाले
महावितरण परिमंडल कार्यालयात २०२५-२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मंडल, विभाग व उपविभागीय प्रमुखांचा गौरव केला (फोटो -टीम नवराष्ट्र)
Follow Us:
Follow Us:
Pune News : पुणे : महावितरण पुणे परिमंडलाने सरत्या आर्थिक वर्षात २ हजार १६५ कोटी रुपये वसुली करुन उत्तम कामगिरी केली आहे. मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी विभाग व उपविभागामध्ये वसुलीसाठी लावलेल्या निकोप स्पर्धेमुळेच हे शक्य झाले आहे. यावेळी जे यश मिळाले आहे ते पुढील काळात टिकवून ठेवणे आवश्यक असून, एक चुकीचे वीजबिल सुद्धा आपले मापदंड बिघडवू शकते. त्यामुळे अचूक वीजबिल देणे व ग्राहकांकडून ते वेळेत वसूल करणे हे काम आपल्याला सातत्याने करावे लागेल असे मत महावितरणचे कार्यकारी संचालक डॉ. भूजंग खंदारे यांनी व्यक्त केले आहे.
रास्तापेठ येथील महावितरण परिमंडल कार्यालयात २०२५-२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मंडल, विभाग व उपविभागीय प्रमुखांचा बुधवारी (दि. १५) मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्य अभियंता सुनिल काकडे, अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, सिंहाजीराव गायकवाड व युवराज जरग यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. खंदारे म्हणाले, ‘वीजबिल वसूल करणे कंपनीचे नाही तर माझे काम आहे, ही जाणीव प्रत्येक कर्मचाऱ्याला असली पाहिजे. ज्या पद्धतीने आपण मार्चअखेरीस काम करतो, तसेच काम संपूर्ण वर्षात केले तर मार्च मध्ये दमछाक होणार नाही.” तर मुख्य अभियंता सुनिल काकडे म्हणाले, “पुणे परिमंडलात एकूण ३ मंडल आणि १२ विभाग आहेत. यात पहिल्या येणाऱ्या आणि शेवटी राहणाऱ्या विभागात केवळ दीड टक्क्यांचा फरक आहे. हा फरक कमी करण्यासाठी आपल्याला वीजबिल वसुलीसह, अचूक बिलींगवर शंभर टक्के काम करावे लागणार आहे.”असे मत त्यांनी व्यक्त केले.
सूत्रसंचालन उपव्यवस्थापक (विवले) संतोष भोसले यांनी तर प्रभारी सहा. महाव्यवस्थापक (विवले) प्रवीण गुंडेली यांनी प्रास्ताविक केले. वरिष्ठ व्यवस्थापक (मासं) शितल निकम यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यकारी अभियंता सतीश सरोदे, सहा. अभियंता राहूल फाये, पवन देशपांडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास परिमंडलातील सर्व कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते व अधिकारी यांची मोठ्या संख्येने उपसिथती होती.
वर्ष २०२५-२६ च्या कामगिरीत उत्कृष्ट ठरलेली कार्यालये
महावितरण पुणे परिमंडलाच्या वार्षिक पुरस्कार २०२५-२०२६ मध्ये गणेशखिंड शहर मंडळाने प्रथम क्रमांक पटकावून उत्कृष्ट मंडळाचा मान मिळवला आहे, अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांनी तो स्विकारला. तर उत्कृष्ट विभागाच्या श्रेणीत कार्यकारी अभियंता नितीन थिटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर विभाग प्रथम आला असून, नगररोड विभाग- दिपक पाटील दुसऱ्या आणि पर्वती विभाग- निलेश फलके तिसऱ्या स्थानावर राहिला आहे.
उपविभागांमध्ये रास्तापेठ शहर मंडलात पेशवे पार्क व मंडई उपविभाग (उमेश कवडे व सुनिल कुरील) प्रथम, हडपसर (विष्णू पवार) द्वितीय आणि वाडिया (प्रमोदकुमार गायकवाड) तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. गणेशखिंड शहर मंडलात शिवाजीनगर उपविभागाने (अमित भरते) प्रथम, औंध उपविभागाने (अविनाश लोखंडे व उमेश करपे) द्वितीय आणि सांगवी व हिंजवडी उपविभागाने (कल्याण गिरी व सचिन पाटील) तृतीय क्रमांक मिळवला आहे. तसेच पुणे ग्रामीण मंडलात नसरापूर उपविभाग (सिध्दार्थ सोनसळे) प्रथम, तळेगाव (जयप्रकाश सागरे) द्वितीय आणि चाकण एमआयडीसी (प्रकाश शेळके) उपविभागाने तृतीय क्रमांक मिळवला.
जाहिरात
जाहिरात
Web Title: Honoring of circle division and sub division heads for outstanding performance in mahavitaran 2025 26