पुण्यात कोसळल्या हलक्या सरी (फोटो- सोशल मीडिया)
पुणे शहरात आज हलक्या सरींची हजेरी
तीन ते चार दिवस ढगाळ हवामान राहणार
संध्याकाळच्या सुमारास हलक्या ते अतिहलका पाऊस पडण्याची शक्यता
पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र, बुधवारी (ता. १५) दिवसभर अधूनमधून हलक्या सरींनी हजेरी लावली. हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस पुणे परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची आणि दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास हलक्या ते अतिहलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांत, तर मराठवाडा व विदर्भातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. गुरुवारी (ता. १६) पुणे, सातारा आणि सातारा घाट विभागासह सांगली, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
पुणे शहरात बुधवारी कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. दिवसभर आकाश ढगाळ राहिल्याने वातावरणात गारवा जाणवत होता. गुरुवारी तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नसून, किमान तापमान २३ अंश आणि कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.
पुणे जिल्ह्यात बुधवारी कुठे किती पाऊस?
ठिकाण – पाऊस (मिमी)
निमगिरी – १३.०
दौंड – ७.५
कुर्वंडे – ४.५
बल्लाळवाडी – ३.५
चिंचवड – २.५
माळीण – १.५
दापोडी – १.५
पाषाण – १.२
गिरिवन – १.०
तळेगाव – १.०
इंदापूर – १.०
भोर – ०.५
राजगुरुनगर – ०.५
शिवाजीनगर – ०.४
21 जुलैनंतर पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सध्या काहीशी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानात वाढ झाली असून नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, पालघर आणि रायगड परिसरात दमट वातावरणामुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. याचदरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, पुढील चार ते पाच दिवस राज्यात तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम सरी कोसळू शकतात
दरम्यान, पुणे, रायगड, पालघर, ठाणे, नाशिकसह अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी आणि विजांच्या कडकडाटासह हवामानात बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, 21 ते 22 जुलैनंतर बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढू शकतो.






