'पुणे महापालिकेतील समाविष्ट गावांना तातडीने आवश्यक पाणी पुरवठा करा'; सभापती प्रा. राम शिंदेंच्या सूचना
पुणे : महापालिकेने 2018 पासून समान पाणी पुरवठा योजना आणली. मात्र, अद्याप कात्रज, कोंढवा, येवलेवाडी, पिसोळी या विभागात अपुऱ्या प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. ही बाब गंभीर असून, पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना तातडीने योग्य प्रमाणात पाणी पुरवठा होईल, या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.
विधानपरिषदेचे सदस्य आमदार योगेश टिळेकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५ मध्ये ‘लक्षवेधी’च्या माध्यमातून या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. यासंदर्भात सभापती प्रा. शिंदे यांनी आपल्या दालनात बैठक घेऊन याबाबत निर्देश दिले. या बैठकीस विधानपरिषदेचे सदस्य आमदार योगेश टिळेकर, विधानमंडळाचे सचिव डॉ.विलास आठवले, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम (दूरदृष्य प्रणालीद्वारे), अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उप सचिव नगरविकास प्रियंका छापवाले उपस्थित होते.
हेदेखील वाचा : अखेर १३ वर्षानंतर भारतात परफॉर्म करणार पॉप गायक Enrique Iglesias; जाणून घ्या कधी, कुठे होणार कॉन्सर्ट?
सद्य:स्थितीत पुणे महापालिकेला १४ टीएमसी पाणी देण्याचा करार करण्यात आला आहे. आता नवीन ३४ गावांसाठी पाणी पुरवठा योजना तयार करताना २१ टीएमसी उपलब्ध करुन देण्याचा करार करावा. सन २०१८ मध्ये सुरु झालेली समान पाणी पुरवठा योजना अद्याप अपुरी असून, गांभीर्याने नियोजन करुन लवकरात लवकर हा पाणी प्रश्न सोडवावा, असे निर्देश प्रा. शिंदे यांनी दिले.
हेदेखील वाचा : Local Body Elections: महापालिका निवडणुकीबाबत महत्त्वाची बातमी; पुणे-ठाण्यासह 9 महापालिकांमध्ये प्रभाग रचनेचे आदेश