पुण्यात वर्षभरात 72 व्हेईकलचे अपघात (फोटो- istockphoto)
पुणे/अक्षय फाटक: शहरातील वाहतूक कोंडीने आणि अपघाताने पुणेकरांचा जीव मुठीत धरला आहे. नगर रस्त्यावर झालेल्या भीषण अपघाताने शहरातील अपघातांची भयावह परिस्थिती दर्शवली असताना पुण्यात वर्षात तब्बल ७२ ‘हेवी व्हेईकल’चे भीषण अपघात झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, त्यातील १२ अपघात हे एकट्या नगर रस्त्यावर झाले आहेत. ज्यात १५ जणांचा जीव गेला आहे.
सायकलीचं शहर ते दुचाकी आणि आता प्रचंड वाहतूक कोंडीचे शहर अशी पुण्याची बदलती ओळख होत आहे. गेल्या काही वर्षात वाहतूक कोंडीची स्थिती बिकटच होत चालली आहे. पोलीस तसेच महापालिका प्रशासन सर्वोतपरी उपाययोजना करत असताना देखील वर्षाला वाढत जाणारी वाहन संख्या ही स्थिती जशाच तशी ठेवत आहे. त्यात बेशिस्त वाहन चालकांमुळे अपघात सत्र सुरूच आहे.
सर्व सामान्यांना आपली जीव मुठीत धरूच वाहने चालवावी लागतात. अपघात वाढत आहेत आणि त्यात हाकनाक नागरिकांचा बळी जात आहे. कधी मस्तवाल वाहन चालक जीव घेतात तर कधी मद्याच्या नशेतील चालकांकडून चिरडले जाते. अधून-मधून अतिवेग संकटात घेऊन जात आहे. अपघाताची काही हॉटस्पॉट तयार झाले आहेत. ज्याठिकाणी सर्वाधिक अपघात होत आहेत. नवले पूल हा त्यातीलच एक स्पॉट होता. मात्र, तेथील रस्त्याचे कामकाज केल्यापासून अपघाताचे प्रमाण लक्षणीय कमी झाल्याचे देखील पाहयला मिळत आहे.
हेही वाचा: Ulhasnagar Hit And Run : पुन्हा हिट अँड रन, मद्यधुंद कार चालकाची चार वाहनांना, नऊ गंभीर जखमी
नवले पुलाप्रमाणे नगर रस्ता तसेच सोलापूर रस्ता अपघात रस्ता बनला आहे. दररोज अपघाताच्या घटना या रस्त्यांवर घडत आहेत. मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे असल्याचा आव आणत उपाययोजना शोधते. मात्र, पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. दुसरे जड वाहनांना (हेवी व्हेईकल) शहरातील काही भागात ठरावीक वेळ दिलेली आहे. त्यावेळेतच त्यांना या भागांमध्ये प्रवेश दिला जातो. मात्र, सर्रास याचे उल्लघंन होत असल्याचे पाहायला मिळते. या जड वाहनांमुळे वाहतूक कोंडी देखील मोठी होते. पोलीस कारवाईचा दिखावा करतात, मात्र ठोस कारवाई होत नाहीच. त्यामुळे या हेवी व्हेईकल वाहनांचा बिनदक्त सर्वत्र वावर असतो. शहरात ७२५ अधिक अपघात झाले आहेत. त्यात ७२ अपघात हे हेवी व्हेईकल (जड वाहने) यांचे झाले असून, त्यात ७६ जणांचा जीव गेला आहे.
शहरात एकूण अपघात- २७५
हेव्ही व्हेकलचे अपघात– ७२, मृत्यू ७६
नगर रस्त्यावरील हेवी व्हेकल अपघात- १२, मृत्यू १५
हेही वाचा: वाघोलीत डंपरने 9 जणांना चिरडल्याचे प्रकरण; पोलिसांकडून मालकावर अटकेची कारवाई
ही आहेत अपघाताची कारणे…
– पुण्यात लाईन कटींगचे प्रमाण सर्वाधिक
– वाहनांचा वेग अधिक, ओव्हरटेक करताना काळजी न घेणे
– वाहतूकीचे नियम पाळले जात नाहीत.
– लोणीकंद पोलिसांच्या हद्दीत रस्त्यांवर काही अंतर स्ट्रीट लाईट नाही.
– रस्त्यावर पडलेले खड्डे, उंच गतीरोधक
– पादचारी कोठूनही रस्ता ओलांडतात.
ही घ्या काळजी…
– दुचाकी वाहन चालकांनी हेल्मेट परिधान करावे.
– वाहनांचा वेग मर्यादितच असावा
– ओव्हरेट करताना काळजी घ्यावी, लेन कटींग करू नये
– वाहतूकीचे नियमांचे पालन करावे
– पादचारी मार्गावरूनच रस्ता ओलांडावा