शिक्रापूर : कारेगाव (ता.शिरुर) येथील पुणे-नगर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या हॉटेल राजरत्नसमोर दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्याच्या खिशातील दोन हजार रुपये चोरले असून, याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात संतोषकुमार श्रीदेवो शर्मा यांनी फिर्याद दाखल केली. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करत तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कारेगाव (ता.शिरुर) येथील घटनेबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोषकुमार श्रीदेवो शर्मा हे शनिवारी (दि.१९) रात्री ८ च्या सुमारास कारेगाव येथील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या राजरत्न हॉटेलसमोर असताना तीन अनोळखी तरुण (एमएच १२ सी.यू. ८२३८) या दुचाकीवरुन येऊन हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांच्या खिशातून जबरदस्तीने दोन हजार रुपये चोरुन नेले. त्यानंतर संतोषकुमार यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तातडीने तपास करत रविवारी (दि.२०) पहाटे तीनही आरोपींना अटक केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुंडे हे करत आहेत.






