फोटो सौजन्य - Social Media
पीसीएम गटाची पहिली पात्रता परीक्षा ११ ते २० एप्रिलदरम्यान पार पडली असून दुसरी परीक्षा १४ ते १७ मेदरम्यान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्या परीक्षेचा निकाल वेळेत जाहीर झाल्यास विद्यार्थ्यांना दुसऱ्या अटेंप्टसाठी पुरेसा कालावधी मिळेल आणि ते अधिक चांगली तयारी करू शकतील, असे थोरात यांनी नमूद केले आहे. विशेष म्हणजे, पहिल्या अटेंप्टचा निकाल उशिरा लागल्यास दुसऱ्या परीक्षेचे नियोजन बिघडण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
तसेच, सीईटी कक्षाने JEE Main आणि CBSE यांच्या निकाल प्रक्रियेचा आदर्श घ्यावा, असेही त्यांनी सुचवले. संगणकाधारित पद्धतीने परीक्षा घेण्यात येऊनही निकाल जाहीर करण्यास इतका विलंब का होत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तांत्रिकदृष्ट्या सक्षम यंत्रणा असतानाही विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यंदा प्रथमच सीईटी परीक्षेसाठी दोन अटेंप्टची सुविधा देण्यात आली आहे. मात्र, पहिल्या अटेंप्टचा निकाल अद्याप जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिल्या निकालाच्या आधारे दुसरा अटेंप्ट द्यायचा की नाही, याबाबत विद्यार्थी साशंक आहेत, त्यामुळे त्यांच्या तयारीवरही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
जर पहिल्या अटेंप्टचा निकाल वेळेत जाहीर झाला, तर विद्यार्थ्यांना योग्य निर्णय घेता येईल आणि दुसऱ्या परीक्षेसाठी नियोजनबद्ध तयारी करता येईल. परिणामी, सीईटी कक्षाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून लवकरात लवकर निकाल जाहीर करावा, अशी मागणी ॲड. वैभव थोरात यांनी पुन्हा एकदा केली आहे.






