छोट्या व्यावसायिकांचे पुनर्वसन होणार (फोटो- पुणे मेट्रो)
पुणे: महामेट्रोच्या महात्मा फुले मंडई स्टेशनच्या कामासाठी स्थलांतरीत केलेल्या १५२ छोट्या व्यावसायीकांचे येत्या काही महिन्यांत पुर्वीच्या जागेवरच पुर्नवसन होणार आहे. यासंदर्भात महामेट्राेने दिलेल्या प्रस्तावावर महापािलका अभिप्राय देणार आहे. मंडई मेट्रो स्थानकाकडून काका हलवाईकडे जाणार्या पादचारी भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच पुर्वीच्याच जागेवर व्यावसायीकांना स्थलांतरीत करण्यात येणार आहे.
पुणे मेट्रोच्या पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मेट्रो मार्गिकेतील शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यानच्या भुयारी मार्गात शिवाजीनगर, जिल्हा न्यायालय, कसबा पेठ, महात्मा फुले मंडई आणि स्वारगेट ही स्थानके आहेत. या पाचही स्थानकांपैकी कसबा पेठ आणि महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशनचे काम हे सर्वाधिक जिकरीचे होते. या दोन्हीही स्टेशन्सचा परिसर हा अगदी मध्यवर्ती आणि जुने वाडे आणि दाट बाजार पेठेचा आहे. त्यामुळे भुयारी मार्गांत ड्रिलिंग करताना महामेट्रोच्यावतीने विशेष दक्षता घेण्यात आली होती. कसबा स्टेशनच्या लगत जुने वाडे आहेत, तर मंडई स्टेशनच्या परिसरात व्यावसायीक आहेत.
मंडई मेट्रो स्टेशनच्या परिसरात काम करताना येथील १५२ छोट्या व्यावसायीकांचे तात्पुरते पुर्नवसन करण्यात आले आहे. यामध्ये किराणामाल, कटलरी, पान शॉप यासारख्या व्यावसायीकांचा समावेश आहे. काही व्यावसायीकांचे हुतात्मा बाबू गेनू वाहनतळ येथे तर काहींचे काका हलवाई दुकानामागे तात्पुरते पुर्नवसन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मेट्रो मार्गिका काही महिन्यांपुर्वी सुरू झाली असून सर्व स्टेशन्सचा वापरही सुरू झाला आहे. परंतू प्रवाशांना या स्टेशन्सकडे जाणार्या भुयारी मार्गांचे काम अद्याप सुरू आहे.
हेही वाचा: Pune Metro: “महामेट्रो कंपनीने तत्काळ ‘ही’ सेवा कोथरूडमधील…”; मनसेने केली महत्वाची मागणी
मंडईतील टिळक पुतळया समोरील रस्त्यावरून तुळशीबागे समोरील रस्त्याच्या पादचारी भुयारी मार्गाचे कामही प्रगतीपथावर आहे. हे काम येत्या आठ ते नउ महिन्यांत पुर्ण करून हे काम झाल्यानंतर स्टेशन परिसरातून हलविलेल्या १५२ विक्रेत्यांसाठी कामही तातडीने हाती घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. मंडई मेट्रो स्टेशन्सकडे जाणार्या भुयारी मार्गाचे काम येत्या सात ते आठ महिन्यांत पुर्ण होईल. स्टेशनच्या कामासाठी हलविलेल्या विक्रेत्यांचे महापालिकेने तात्पुरते पुर्नवसन केले आहे. किती विक्रेते आहेत, याची माहिती महापालिकेकडेच आहे. महापालिका देईल त्या यादीनुसार या विक्रेत्यांचे पुर्वीच्याच जागेवर पुर्नवसन करण्यात येणार आहे. यासाठी लवकरच गाळे बांधण्याचे काम हाती घेण्यात येईल, अशी माहीती महामेट्राेचे संचालक हेमंत सोनवणे यांनी दिली.
मंडई मेट्रो स्टेशनच्या कामासाठी येथील १५२ छोट्या व्यावसायीकांचे तात्पुरते पुर्नवसन करण्यात आले आहे. मेट्रो स्टेशनचे काम झाल्यानंतर या व्यावसायीकांचे पुर्वीच्याच जागेवर कायमस्वरुपी पुर्नवसन करण्यात येणार आहे. यासाठी महामेट्रो गाळे बांधून देणार आहे. नुकतेच महामेट्रोने या कामासाठीचे नकाशे सादर केले असून महापालिकेचा अभिप्राय मागविला आहे. हे काम लवकरात लवकर करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे.