महापािलकेत मनसे विरुद्ध अायुक्त(File Photo : Pune Municipal) Corporation
पुणे : स्वारगेट एसटी बस स्थानकात एका 26 वर्षीय तरूणीवर अत्याचार करण्यात आला. या अत्याचाराच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. या अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका ‘अॅक्शन मोड’वर आली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने या परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई केली आहे.
पुणे महापालिकेने अतिक्रमण विभागामार्फत दिलेले परवाने व फेरीवाला प्रमाणपत्रामधील अटी शर्तीचा भंग करणारे व्यावसायिक यामध्ये स्वतः व्यवसाय न करणे, पोटभाडेकरू ठेवणे, मान्य जागेवर व्यवसाय न करणे, मान्य व्यवसाय न करणे, सिलेंडरचा वापर करणे आदी प्रकारे अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी क्षेत्रिय अतिक्रमण निरीक्षक, अतिक्रमण निरीक्षक, सहाय्यक अतिक्रमण निरिक्षक, जेसीबी, बिगारी सेवक, पोलीस कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी तसेच स्थानिक पोलीस कर्मचारी यांचे समवेत कारवाई सुरळीतपणे पार पडली. तसेच अधिकृत फेरीवाले व्यवसायिकांना सद्यस्थितीत व्यवसाय बंद ठेवण्यास सांगण्यात आलेले आहे
पुणे महापालिकेच्या बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय हद्दीमधील स्वारगेट एसटी स्टँड परिसरातील रस्ता पदपथावरील अनधिकृत अतिक्रमण काढण्यात आले. अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त संदीप खलाटे, महापालिका सहाय्यक आयुक्त प्रदीप आव्हाड, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या नियंत्रणाखाली पुणे शहर पोलिस अंतर्गत स्वारगेट पोलीस स्टेशन यांचे समवेत अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली.
स्वारगेट एसटी बस स्थानकावर राज्यातील विविध जिल्ह्यात प्रवासासाठी बससेवा आहे. त्यामुळे 24 तास हा परिसर गजबलेला असतो. प्रवाशांची मोठी तसेच वाहनांची मोठी संख्या यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी सातत्याने होत असते. स्थानकाबाहेरील पदपथावर अनधिकृत व्यावसायिक मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहतूकीला अडथळा तसेच पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
स्वारगेट अत्याचार प्रकरण तापले
स्वारगेट स्थानकावर अत्याचाराची घटना घडल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. या परिसरात एसटी प्रशासनाकडून तसेच पोलिसांकडून लक्ष दिले जात नाही. अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यात राजकीय पक्षांकडून तसेच सामाजिक संस्थांकडून आंदोलन देखील करण्यात आली आहेत. त्याची दखल घेत महापालिकेने स्वारगेट स्थानकावर अतिक्रमण कारवाई केली, असे अतिक्रमण विभागाने सांगितले.
स्वारगेटसह शिवाजीनगर अन् पुणे स्टेशनचे सेफ्टी ऑडिट होणार
स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या धक्कादायक अत्याचाराच्या प्रकरणानंतर महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावीपणे उपाययोजना केल्या जात आहेत. पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी ऑडिट मंगळवारपासून सुरू केले असून, निर्जन स्थळे, टेकड्या, रेल्वे स्टेशन तसेच डार्क स्पॉट्स यांची तपासणी केली जाणार आहे.
नराधम गाडेला अटक
पुण्यातील स्वारगेट एसटी बसस्थानकावरील शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या अत्याचारानंतर संबंधित आरोपी हा घटनास्थळावरून पळून गेला होता. पोलिसांत तक्रार येताच गुन्हा दाखल करत पोलिसांची विविध पथके त्याच्या मागावर होती. अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले असून, मध्यरात्री दीडच्या सुमारास त्याला गुणाट या गावातून अटक करण्यात आली.