सुस बाणेरकरांनी भर प्रचार सभेत अजित पवारांना दाखवला आरसा (Photo Credit - X)
प्रभाग क्रमांक नऊ मध्ये पक्षाने लोकप्रियता घटल्याने अमोल बालवडकर यांना काही काळ थांबण्यास सांगितलं होतं. मात्र अति आत्मविश्वासा पोटी अमोल बालवडकर यांनी पक्षाशी पंगा घेत उपमुख्यमंत्री अजित पवारांशी (Ajit Pawar) हात मिळवणीकेली आणि भाजपाशी बंडखोरी केली आहे. बालवडकर यांच्या या बंडखोरीमुळे एकीकडे भाजपला मानणारा वर्ग नाराज झाला असून दुसरीकडे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून देखील नाराजीचा सूर उमटताना पाहायला मिळत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये प्रचाराला उपस्थिती लावली मात्र या प्रचाराच्या सभेच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावांतांनी लावलेले बोर्ड चर्चेचा विषय ठरले. बोर्डच्या माध्यमातून सुस बाणेर आणि पाषाणकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही सवाल केले आहेत.
दादा हाच का तुमचा वादा असं म्हणत प्रभाग क्रमांक नऊ मधील नागरिकांनी अजित पवारांना प्रश्न केला आहे. जमीन लाटणाऱ्या व्यक्तीचा तुम्ही प्रचार करणार का ? असा संतप्त सवाल यावेळी मतदारांनी अजित पवार यांना विचारला आहे. दादा तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. अस म्हणत मतदारांनी आपली नाराजी या पोस्टच्या माध्यमातून उघड केली आहे. या पोस्टरच्या खाली तुमच्यावर प्रचंड प्रेम करणारे मात्र प्रभाग क्रमांक नऊ मधील अमोल बालवडकर यांना दिलेल्या उमेदवारीमुळे नाराज झालेले सर्व मतदार असं लिहिण्यात आलं आहे.
ऐनवेळी बालवडकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन निवडणुकीचे तिकीट दिल्याने परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधून अमोल बालवडकर यांचे तिकीट निश्चित झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन माजी नगरसेवकांचे देखील तिकीट कापले गेले आहे. त्यामुळे त्यांचे समर्थक देखील प्रचंड नाराज आहे आणि हीच नाराजी कुठेतरी आता पोस्टरच्या माध्यमातून बाहेर निघताना दिसत आहे. त्यामुळे ही खदखद राष्ट्रवादी काँग्रेससाठी घातक मानली जात आहे. याचा फटका निश्चितच निवडणुकीमध्ये बसण्याची शक्यता आहे.






