(फोटो- टीम नवराष्ट्र)
बारामती: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये मंगळवारपासून स्वाभिमान यात्रा सुरू केली. श्रीक्षेत्र कन्हेरी येथील मारुती मंदिरात दर्शन घेऊन या यात्रेस त्यांनी सुरुवात केली. बारामती तालुक्यातील मुढाळे येथील बैलगाडा शर्यतीस उपस्थित राहत उपस्थित नागरिकांशी संवाद साधला तसेच इतर भागात घोंगडी बैठकांच्या माध्यमातून ग्रामस्थांशी संवाद साधताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपणास संधी मिळाल्यास बारामतीचा अधिक मोठ्या प्रमाणावर आपण विकास करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात सुरू केलेल्या जनसन्मान यात्रेची चर्चा सर्वत्र रंगली असताना त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी बारामती मध्ये स्वाभिमान यात्रा सुरू करून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शह देण्यास सुरुवात केल्याचे या यात्रेवरून स्पष्ट झाले आहे. बारामती शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये या स्वाभिमानी यात्रेच्या माध्यमातून युगेंद्र पवार नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
कण्हेरी येथील मारुती मंदिर येथे दर्शन घेऊन सकाळी ९ वाजता युगेंद्र पवार आपल्या यात्रेची त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर ९.१५ वाजता माळावरच्या देवीचे दर्शन घेऊन ते पक्ष कार्यालयात १२ वाजेपर्यंत उपस्थित राहिले, यावेळी त्यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. दुपारी २ वाजता मुढाळे येथील बैलगाडा शर्यतीस भेट देऊन त्यांनी बैलगाडा मालक तसेच उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला. यानंतर माळेगाव बुद्रुक सह गोफणे व वाघमोडे वस्ती, माळेगांव कारखाना, येळे ढाळे वस्ती येथे भेट देऊन तेथील नागरिकांशी त्यांनी संवाद साधून आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपणास संधी मिळाल्यास बारामतीचा आपण गतीने मोठ्या प्रमाणावर विकास करून दाखवू असे आश्वासन त्यांनी यावेळी या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष एस एन जगताप, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष वनिता बनकर, शहराध्यक्ष आरती शेंडगे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ही स्वाभिमानी यात्रा १२ दिवसांची असून बारामती तालुक्यातील सर्व गावांना युगेंद्र पवार भेटी देणार आहेत. पक्षाच्या वतीने या यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा हात स्वत:च्या घेतलेले छायाचित्र या स्वाभिमान यात्रेच्या पोस्टरवर छापण्यात आले आहे. ‘आदरणीय शरद पवार साहेब यांच्या आशीर्वादाने आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ या आपल्या पक्षाचा आणि ‘पवारसाहेबां’चा पुरोगामी प्रागतिक विचार बारामती विधानसभा मतदारसंघात सर्वदूर पोहोचविणे हा या यात्रेचा उद्देश आहे. लोकसभेत दिलेल्या साथीबद्दल बारामती तालुक्यातील जनतेप्रति कृतज्ञता आपण व्यक्त करत आहोत.
– युगेंद्र पवार.






