सौजन्य - नवराष्ट्र टीम
सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. तसेच सगेसोयरेची अंमलबजावणी करण्याची मागणी ते सातत्याने करत आहेत. दरम्यान ओबीसी समाजसुद्धा आपले आरक्षण वाचवण्यासाठी पुढे आला आहे. ओबीसी समाजचे नेते लक्ष्मण हाके हे यामध्ये अग्रेसर आहेत. ते सातत्याने जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी ‘नवराष्ट्र’ डिजिटलशी खास बातचीत केली आहे. यामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करताना जरांगे पाटील यांच्यावर टीका देखील केली आहे.
‘नवराष्ट्र’ डिजिटलला दिलेल्या मुलाखतीमध्ये ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके म्हणाले, ”आरक्षण म्हणजे नक्क्की काय ते आपण समजून घेतले पाहिजे. आरक्षण म्हणजे नक्की काय हे राज्यातील जनतेला समजवून सांगितले तर असे संघर्ष निर्माण होणार नाहीत. सगेसोयरे ही व्याख्या कोणत्याही न्यायालयीन प्रक्रियेत नाही. सगेसोयरे व्याख्या कुठेही लिखित नाही. सगेसोयरेच्या अध्यादेशामुळे केवळ ओबीसी समाजाचे नाही तर एसटी आणि एससीचे आरक्षण संपून जाईल. सगेसोयरेंचा आदेश कोणत्याही परिस्थितीत शक्य नाही.”
पुढे बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, ”जरांगे पाटलांचा शोषितांचा, वंचितांचा सुरू झालेला लढा आता याला पाडा, याला गाडा, त्यांच्या ५ पिढ्या आल्या नाही पाहिजेत. ओबीसींना पाडा. त्यांचे राजकारणातले नेतृत्व संपवा. छगन भुजबळ ज्या ज्या ठिकाणी जातील तिथले आमदार पाडा इथपर्यंत येऊन पोहोचला आहे. जरांगे पाटील कोणाच्या तरी सांगण्यावरून आंदोलन उभे करतात, पुढे नेतात , प्रत्येक आंदोलनात भूमिका बदलतात. त्यांच्या मागणीत तथ्य आहे असे मला वाटत नाही. परंतु त्यांच्या मागे मोठ्या प्रमाणात माणसे जातात याची चिंता वाटते. जरांगे पाटील २८८ जागा लढवू शकत नाहीत. लढवायच्याच असतील तर त्यांनी घनसावंगी, गेवराई, तासगाव कवठेमहाकाळ, बारामतीमध्ये द्यावेत. ”
मनोज जरांगे पाटील हे सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करताना पाहायला मिळत आहेत. पुढे बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, ”निवडणूक लढवणे म्हणजे राज्यातील १२ कोटी जनतेचा कॅनव्हास डोळ्यासमोर ठेवावा लागतो. जरांगे पाटलांच्या आंदोलनात राजकीय वास येत आहे. एकनाथ शिंदे तुझसे बैर नाही, देवेंद्र ‘तेरी खैर नही, जरांगे पाटलांना आपला सपोर्ट आहे, असे जर का एका पुरोगामी नेत्याच्या कन्या बारामतीच्या खासदार आहेत. ज्याओबीसींच्या मतावर खासदार झाल्या. त्यामुळे अशा नेतृत्वाबद्दल काय बोलावे?”