फुलपाखरांचा महिना (फोटो- istockphoto)
पुणे/सुनयना सोनवणे: फुलपाखरांना निसर्गाने रंगांची उधळण करून सुंदर रूप दिले आहे. या फुलांवरून त्या फुलांवर सैरभैर फिरणारे फुलपाखरू सर्वांनाच आकर्षित करते. पावसाळ्यानंतर कोवळ्या उन्हात मुक्तपणे विहारनारी फुलपाखरे आपल्या परिसराची एकंदरीत गुणवत्ता उत्तम असल्याचे सांगतात. तसेच त्यांच्या सौंदर्याव्यतिरिक्त फुलांच्या परागीकरणातही ते महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे जिथे फुलपाखरू असतात तिथे जैवविविधता समृद्ध असते, असे मानले जाते. फुलपाखराला जगातील सर्वाधिक आकर्षक कीटकाचा मान मिळाला आहे. गेल्या काही वर्षात फुलपाखरांची वसतीस्थाने नष्ट होत असल्यामुळे त्यांच्या अनेक प्रजाती धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे या फुलपाखरांना वाचविण्याची गरज आहे.
सप्टेंबर महिना हा ‘बिग बटरफ्लाय मंथ’ म्हणून साजरा केला जातो. याद्वारे फुलपाखरांचे विश्व उलगडण्याचा प्रयत्न केला जातो. कुठल्या भागात कोणत्या प्रजातीची फुलपाखरे आढळतात, त्यांचा अधिवास इत्यादी संदर्भात अभ्यास केला जातो. फुलपाखरांचे आकर्षण असलेल्या देशभरातील निसर्गप्रेमींनी एकत्र येऊन फुलपाखरांच्या माहितीचा संग्रह करावा आणि त्यातून फुलपाखरांच्या संवर्धनाला मदत व्हावी म्हणून हा उत्सव आयोजित करण्यात येतो.