पावसाळ्यात कृत्रिम पुराचा धोका; आळेफाट्यात ओढे-नाले गाडून उभं राहतंय काँक्रीटचं साम्राज्य
आळेफाटा : महामार्गांच्या संगमामुळे वेगाने विस्तारत असलेल्या आळेफाटा शहरात विकासाच्या नावाखाली निसर्गाच्या छाताडावर बुलडोझर फिरत आहे. शहरातील नैसर्गिक जलवाहिन्या असलेले ओढे, पाणवठे आणि नाले मुरूम टाकून बुजवले जात आहे. त्या जागी व्यावसायिक गाळे आणि बहुमजली इमारती उभारल्या जात आहेत. परिणामी, पावसाचे पाणी वाहून जाण्याचे मार्गच संपुष्टात येत असल्याने भविष्यात आळेफाट्याला कृत्रिम पुराचा मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शहरातील सुमारे ८० टक्के सांडपाणी आणि पावसाळी पाण्याचा निचरा करणारा मुख्य नाला सध्या अतिक्रमणांच्या विळख्यात अडकला आहे. रात्रीच्या अंधारात जेसीबीच्या सहाय्याने नाल्यात मुरूम टाकून नैसर्गिक प्रवाह बंद करण्याचे प्रकार सुरू आहेत. विशेष म्हणजे, या गंभीर प्रकारांकडे महसूल प्रशासन, ग्रामपंचायत आणि संबंधित विभागांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सामाजिक कार्यकर्ते नवनाथ वाळुंज यांनी सांगितले की, ऑगस्ट २०२५ पासून उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि मंडलाधिकाऱ्यांकडे अनेकवेळा लेखी तक्रारी दिल्या आहेत. विभागीय आयुक्तांनीही कारवाईचे निर्देश दिले. मात्र, प्रत्यक्षात पंचनाम्यापलीकडे काहीच घडताना दिसत नाही. फक्त नालेच नव्हे, तर परिसरातील ७० ते ८० वर्षांची विशाल वडाची झाडेसुद्धा मुळासकट नष्ट केली जात असल्याचे समोर आले आहे.
वडगाव हद्दीत जागा मोकळी करण्यासाठी झाडांना आग लावण्याचे प्रकार होत असून, पर्यावरणप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे. वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची निष्क्रियता भूमाफियांना बळ देत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.
पाण्याचे नैसर्गिक मार्ग संपुष्टात येण्याची शक्यता
आळेफाट्याचा विकास हा पर्यावरणपूरक आणि नियोजनबद्ध होणार की निसर्ग उद्ध्वस्त करून फक्त आर्थिक फायद्यासाठी होणार, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. पाण्याचे नैसर्गिक मार्ग संपुष्टात आल्यास भविष्यात शहराला पाणी साचणे, पूरस्थिती आणि भूजल पातळी घटण्यासारख्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
इमारतींना परवानगी कोणी दिली?
नाल्यांवर उभ्या राहणाऱ्या इमारतींना परवानगी कोणी दिली? रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या मुरूम टाकण्याच्या कामांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का? पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी वनविभाग आणि महसूल विभाग कारवाई कधी करणार? विकासाच्या नावाखाली नैसर्गिक जलमार्ग संपवण्याचा अधिकार कोणी दिला? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
नैसर्गिक संकटाचा करावा लागेल सामना
हा लढा केवळ एका नाल्यासाठी नाही, तर पुढच्या पिढीच्या सुरक्षित भविष्यासाठी आहे.प्रशासनाने वेळेत पावले उचलली नाहीत, तर आळेफाट्याला भविष्यात मोठ्या नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.
– नवनाथ वाळुंज, तक्रारदार व स्थानिक ग्रामस्थ






