सासवडमध्ये फ्लेक्स, होर्डिंगवर कारवाई
सासवड: गेली अनेक दिवस चर्चेच्या फेऱ्यात अडकलेल्या आणि प्रसिद्धी माध्यमांनी जेरीस आणलेल्या सासवड नगर परिषदेच्या प्रशासनाला अखेर उपरती आली आहे. सासवड शहरातील मुख्य रस्त्यावरील होर्डिंग आणि फ्लेक्स काढून तात्पुरते का होईना फ्लेक्स मुक्त केले आहे. नगरपालिकेचे आरोग्य प्रमुख मोहन चव्हाण तसेच सर्व विभागांचे विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने मोठमोठे होर्डिंग तोडून टाकले. अनेक दिवसांच्या कालावधीनंतर नागरिकांच्या मागणीला यश आले आहे. प्रशासनाच्या कारवाईमुळे नगरपालिकेच्या इमारतीने मोकळा श्वास घेतला असून याबद्दल नागरिकांनी नगर परिषदेचे आभार मानले आहे.
सासवड मधील फ्लेक्स आणि बॅनरबाजी कायमच चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र ठराविक कालावधी नंतर फ्लेक्स काढले जात होते. मात्र तब्बल तीन ते चार वर्षे लोकप्रतिनिधी नसून प्रशासनाच्या हाती कारभार असल्याने प्रशासन पूर्णपणे बेफिकीर पद्धतीने कामकाज करीत होते. सासवड मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा परिसर, नगरपालिका इमारती समोरील परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, एसटी बस स्थानक, जेजुरी नाका या सासवड जेजुरी महामार्गावर दोन्ही बाजूने फ्लेक्स आणि होर्डिंगची अक्षरशः गर्दी झाली होती. होर्डिंगमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तसेच पालिकेची इमारत याला पूर्णपणे बकालपण आले होते.
त्यातच विद्यमान आमदार विजय शिवतारे आणि माजी आमदार संजय जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी फ्लेक्स च्या माध्यमातून शेरशायरी मधून एकमेकांना आव्हान प्रतिआव्हान दिले होते. त्याचीही सर्वत्र जोरदार चर्चा होती. एकूणच फ्लेक्स युद्धामुळे सासवड नागरिक संतप्त झाले होते. त्यामुळे तातडीने फ्लेक्स हटविण्याची मागणी केली होती. नागरिकांच्या मागणीनुसार मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी बैठक घेतली खरी परंतु त्यामध्ये कोणताही ठोस शब्द दिला नव्हता. बैठकीनंतर फ्लेक्स मध्ये वाढ झाली होती. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांनी याबाबत जोरदार आवाज उठवीत प्रशासनाच्या बेफिकीर कामकाजाचा अक्षरशः पर्दाफाश केला होता.
सर्वच बाजूने जोरदार प्रहार आणि टीका झाल्यानंतर प्रशासनाला एकदम उपरती आली. त्यामळे आज मंगळवार दि. २१ रोजी प्रशासनाने सकाळ पासून फ्लेक्स आणि बॅनर हटविण्यास सुरुवात केली. मोठ मोठे होर्डिंग आणि फ्लेक्स काढल्यामुळे नगरपालिका कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तसेच एसटी बस स्थानक परिसर फ्लेक्स मुक्त झाला आहे. विशेष म्हणजे एवढी मोठी कारवाई होत असताना मुखायाधिकारी कैलास चव्हाण कुठेही दिसून आले नाहीत. त्यामुळे मुख्याधिकारी उपस्थित न राहण्यामागचे कारण काय असावे ? असाही प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.
सासवड नगरपरिषद प्रशासनाने जोरदार टीका टिप्पणी झाल्यानंतर फ्लेक्स आणि बॅनर काढून टाकले. त्याच पद्धतीने याच रस्त्यावर तसेच शहरातील फुट पाथवरील थाटलेल्या हातगाड्यावर कारवाई कधी होणार ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. मुख्य रस्त्यावर आणि वर्दळीच्या ठिकाणी अशा पद्धतीने अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तीविरोधात प्रशासन कारवाई कधी करेल का त्यासाठी पुन्हा एकदा आंदोलन करण्याची वेळ येवू देणार ? असा प्रश्न सासवड मधील जेष्ठ नागरिकांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा: सासवडमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट; उद्योजकांची घरे टार्गेटवर
दैनिक नवराष्ट्रचा दणका
सासवड मध्ये फ्लेक्स आणि होर्डिंग उभारण्यासाठी राजकीय नेते आणि त्यांच्या कार्यकर्ते यांच्यात चढाओढ सुरु होती. त्यामुळे शहराला बकालपणा आला होता. त्यामुळे सर्व अतिक्रमण काढण्याची सासवडकर नागरिकांची मागणी होती. मात्र त्यावर करण्याऐवजी मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण आणि संपूर्ण प्रशासन हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून तेरी भी चूप आणि मेरी भी चूप अशाच भूमिकेत वावरत होते. याबाबत दैनिक नवराष्ट्र मध्ये सोमवारी दि. २० चे अंकात ” सासवड नगरीत वाढतोय बकालपणा ” या मथळ्याखाली सासवड नगरपरिषदेच्या नामधारी कार्य पद्धतीचा पर्दाफाश करण्यात आला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने कारवाई चा अखेर बडगा उगारीत सासवड फ्लेक्स मुक्त केले.