पुण्यात विद्यार्थ्यांचे बेमुदत आंदोलन (फोटो- सोशल मिडिया )
पुणे: सामाजिक न्याय विभागाचा ७४६ कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी वळवल्याच्या निषेधार्थ, तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार व आधार योजनेंतर्गत लाभ मिळण्यात होत असलेल्या विलंबाविरोधात राज्यभरातील अर्जदार विद्यार्थ्यांनी पुण्यातील समाजकल्याण आयुक्तालय कार्यालयासमोर २ जून पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ संपत आले असतानाही लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम न पडल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गंभीर आर्थिक व मानसिक अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
आंदोलक विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे की, लाडकी योजनेसाठी वळवलेला निधी पुन्हा सामाजिक न्याय विभागाकडे परत देऊन, स्वाधार-आधार योजनेचे थकीत पैसे तत्काळ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावेत. तसेच स्वाधार योजनेतील लाभ वाढवून ते महागाईच्या प्रमाणात १ लाख रुपये प्रति विद्यार्थी करण्यात यावेत. २०२१ पासून थकीत रकमेचे एकत्रित वितरण, तालुकास्तरावर योजना राबविणे, संकेतस्थळावर बी-स्टेटमेंटचा पर्याय, आणि COEP विद्यापीठातील SC विद्यार्थ्यांकडून घेतलेली फी परत करणे यांसारख्या मागण्या करण्यात आल्या आहेत.
शैक्षणिक वर्ष संपून सुद्धा विद्यार्थ्यांच्या खात्यावर स्वाधार योजना, आधार योजनेचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावर पडत नाही आणि दुसरीकडे सामाजिक न्याय विभागाचा 746 कोटीचा निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे बेमुदत धरणे आंदोलन योजनांचा लाभ खात्यावर येई पर्यंत चालू असणार आहे.
– राजरत्न बलखंडे (अध्यक्ष, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती, महाराष्ट्र राज्य)
जोपर्यंत आमच्या खात्यावर स्वाधारची रक्कम येत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सोडणार नाही.
साक्षी पोटे (अर्जदार विद्यार्थी)
2022-23 पासून माझ्या स्वाधार योजनेचे पैसे थकित आहेत. ते मिळत नाही म्हणून मला कोणतेही काम करून शिकावे लागत आहे. अजून किती वाट पहायची म्हणून मी आंदोलन करायला बसलोय.
ऋषिकेश गवई (अर्जदार विद्यार्थी)
राज्य सरकारकडून वारंवार पाठपुरावा करूनही आवश्यक निधी वितरणावर निर्णय होत नसल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. जोपर्यंत योजनांचा लाभ खात्यावर जमा होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
मे आणि जूनचा हप्ता कधी मिळणार?
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवल्याचा आरोप अतिशय चुकीचा आणि खोटा आहे. अर्थसंकल्प ज्यांना कळत नाही टेक आशा प्रकारचे आरोप करतात. याबाबतीत अर्थमंत्री अजित पवार यांनी देखील सभागृहात सांगितलेले आहे. कोणताही पैसा वळवलेला नाही आणि पळवलेला देखील नाही. ज्यांना अर्थसंकल्प कळत नाही त्यांनी माझ्याकडे यावे. अर्थसंकल्प कसा वाचावा ही पुस्तक मी लिहिलेले आहे. हे पुस्तक मी त्यांना देईन.