पुणे एसटी विभागाला 23 लाखांचे उत्पन्न (फोटो- सोशल मीडिया)
पुणे एसटी विभागाला 23 लाखांचे उत्पन्न
शालेय सहली आणि भाविकांसाठी यात्रा बससेवा सुरू
पर्यटनासाठी ग्रुप बुक करण्याचे प्रमाण वाढले
पुणे: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) शालेय सहली, देवदर्शन आणि पर्यटनासाठी ग्रुपद्वारे एसटी बुक केल्यास संबंधित प्रवाशांना घरापर्यंत सेवा देण्यात येते. पुणे एसटी विभागात ऑक्टोबर महिन्यात शालेय सहलीसाठी १९ आणि देवदर्शन व पर्यटनासाठी १०८ लालपरी बुक करण्यात आले होते. पुणे एसटी विभागाला यातून २३ लाख १० हजार महसूल मिळाला आहे, अशी माहिती एसटी विभागाकडून देण्यात आली आहे.
एसटी महामंडळाकडून शालेय सहली आणि भाविकांसाठी पुणे एसटी विभागातून विशेष यात्रा बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये साडेतीन शक्तिपीठांसह अष्टविनायक यात्रा, गाणगापूर, अक्कलकोट, आदमापूर, नरसोबाची वाडी, गोंदवले यांसह अन्य देवस्थान दर्शन स्थळांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा शैक्षणिक सहलीचे आयोजन करतात. त्यासाठी एसटी बस सवलतीत बुक करण्यात येते. ऑक्टोबर महिन्यात १९ शाळांनी सहलीसाठी १९ बस बुक केले होते. तर देवदर्शन आणि पर्यटनासाठी नागरिकांकडून १०८ बसचे ग्रुप बुकिंग केले होते. यातून सात हजार जणांनी प्रवास केला आहे. भाविकांकडून दर्शन यात्रांचे आयोजन केले तरी त्यामध्ये महिला, ज्येष्ठांना सवलती देण्यात येते. यामुळे पर्यटनासाठी ग्रुप बुक करण्याचे प्रमाण वाढत आहे.
एसटीला इलेक्ट्रिक बसेस वेळेवर न पुरवणाऱ्या कंपनीवर राज्य सरकार मेहेरबान, श्रीरंग बरगे यांचा आरोप!
येथे धावतात यात्रा बस
अष्टविनायक दर्शन, गोंदवले, शिखर शिंगणापूर दर्शन, आदमापूर (बाळूमामा), कोल्हापूर महालक्ष्मी, नरसोबाचीवाडी, खिद्रापूर दर्शन, गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर, गणपतीपुळे, डेरवन, पावस आणि मार्लेश्वर, माहूरगड, सप्तशृंगी या व इतर काही ठिकाणी विशेष यात्रा बसचे आयोजन करण्यात येते.
शालेय सहली, पर्यटन आणि दर्शन यात्रेसाठी ग्रुपने एसटी बुक केल्यावर महामंडळाकडून घरापर्यंत एसटीची सेवा देण्यात येते. यातून पुणे विभागाला २३ लाखांहून अधिक उत्पन्न मिळाले आहे.
अरुण सिया, विभाग नियंत्रक, पुणे एसटी विभाग
MSRTC News: एसटीने नऊ महिन्यांमध्ये दिली 4.50 कोटींची नुकसान भरपाई; आर्थिक तोट्यात असलेल्या…
३८ फुकटे प्रवासी पकडले; २४ हजार ३३२ रुपयांचा दंड वसूल
पुणे एसटी विभागात सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांत फुकटे प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात १७ फुकटे प्रवासी आढळले. त्यांच्याकडून भाडे आणि दंड मिळून १३ हजार ८३१ रुपये वसूल करण्यात आले.तर ऑक्टोबर महिन्यात २१ फुकटे प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून १० हजार ५०१ रुपये दंड आकारण्यात आला आहे. या दोन्ही महिन्यांत एकूण ३८ फुकटे प्रवाशांवर कारवाई करीत एसटी प्रशासनाने २४ हजार ३३२ रुपये दंड वसूल केले आहे. फुकट प्रवास रोखण्यासाठी आणि महसूल गळती थांबवण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.






