संग्रहित फोटो
लोकसभा, कराड उत्तर विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा विजय सुकर करण्यात वेताळ यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. केंद्र-राज्य सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, कृषी क्षेत्राशी निगडित प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवून त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. याच कामगिरीची दखल घेत भाजपाने त्यांच्यावर किसान मोर्चाचे सरचिटणीस आणि कृषी संपर्क समन्वयक यासारख्या जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. हजारो युवकांना पक्षाशी जोडण्याचे काम त्यांनी केले. मात्र, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी घेतलेली ठाम भूमिका आणि काही प्रभावशाली गटांशी झालेला थेट संघर्ष हाच त्यांच्या अडचणींचा प्रारंभ ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद निवडणुकीत विद्या वेताळ यांना उमेदवारी नाकारून राजकीय आकसातून खच्चीकरण करण्यात आल्याचा आरोप वेताळ यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे मौन अधिकच चर्चेचा विषय ठरत आहे. जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांनी उमेदवारीचे सर्वाधिकार आमदार मनोज घोरपडे यांच्याकडे असल्याचे स्पष्ट केले, तर खासदार उदयनराजे भोसले यांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
‘एकला चलो रे’ म्हणत संघर्षाला नवी दिशा
भाजपाने उमेदवारी नाकारल्यानंतर विद्या वेताळ यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय केवळ वैयक्तिक लढा नसून, पक्षातील अन्यायाविरोधातील संघर्ष असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात. विद्या वेताळ यांनी ‘एकला चलो’ची भूमिका स्वीकारली आहे. हा संघर्ष आता केवळ एका गटापुरता मर्यादित न राहता, भाजपसाठी आव्हान ठरू शकतो, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
मुलाखतीचा दावा संशयाच्या भोवऱ्यात
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारीसाठी घेण्यात आलेल्या मुलाखतींना जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ उपस्थित होते. कोपर्डे हवेली गटातून विद्या वेताळ यांनी मुलाखत दिल्याचे स्पष्ट असतानाही नंतर त्यांनी मुलाखतच दिली नाही, असा दावा करण्यात आला. याचे रामकृष्ण वेताळ यांनी ठामपणे खंडन केले आहे. उमेदवारी मागणीसाठी वरिष्ठ नेत्यांची भेट घेतानाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हा दावा अधिक संशयास्पद ठरत आहे.






