पुणे डाक विभागात डिजिटल पेमेंटचा वेग(फोटो-सोशल मीडिया)
PUNE NEWS : डाक विभागाच्या मेल सेवांसाठी सुरू करण्यात आलेल्या डायनॅमिक क्यूआर कोड आणि यूपीआय आधारित डिजिटल पेमेंट सुविधेला पुणे विभागात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अवघ्या तीन महिन्यांत ३.६२ लाख व्यवहारांतून सुमारे ३.८८ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. फोनपे, गुगल पे, यूपीआय तसेच एसबीआय पीओएस मशीनद्वारे होणाऱ्या व्यवहारांमुळे टपाल कार्यालयांतील आर्थिक व्यवहार अधिक वेगवान, सुलभ आणि पारदर्शक झाल्याची माहिती पुणे विभागाचे डाक सेवा संचालक अभिजित बनसोडे यांनी दिली.
सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत पुणे डाक विभागाच्या चार जिल्ह्यांतील विविध टपाल कार्यालयांमध्ये डिजिटल व्यवहारांमध्ये सातत्याने वाढ नोंदविण्यात आली आहे. स्पीड पोस्ट पत्र व पार्सल, मनी ऑर्डर, मोठ्या प्रमाणातील टपाल बुकिंग, विविध बिल भरणा, तिकीट विक्री, फिलाटेली तिकिटांची खरेदी तसेच फ्रँकिंग मशीन रिचार्जसाठी आता क्यूआर कोड स्कॅन किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंटची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
सप्टेंबर महिन्यात ७१.८५ हजारांहून अधिक डिजिटल व्यवहारांतून ६३.३० लाख रुपयांचा महसूल जमा झाला. ऑक्टोबरमध्ये ही संख्या वाढून १ लाखांहून अधिक व्यवहारांद्वारे १.२९ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. तर नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांत १.५० कोटी रुपयांहून अधिक महसूल डिजिटल व्यवहारांतून मिळाला आहे.
डिजिटल पेमेंटमुळे रोख रक्कम किंवा सुट्टे पैसे जवळ ठेवण्याचा त्रास कमी झाला असून, काउंटरवरील व्यवहार अधिक जलद होत आहेत. ग्राहकांना या सुविधांचा वापर करता यावा यासाठी टपाल कार्यालयांतील कर्मचारी मार्गदर्शन करत असून, आवश्यक माहिती देण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
या डिजिटल व्यवहारांमुळे आर्थिक पारदर्शकता वाढली असून ‘तुमचा मोबाईलच तुमचे पाकीट’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात डिजिटल पेमेंटचा वापर आणखी वाढून ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाला अधिक बळ मिळेल, असा विश्वास संचालक अभिजित बनसोडे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा : 2026 च्या टी-२० विश्वचषकासाठी नेपाळ संघाची घोषणा! ‘या’ खेळाडूंची लागली लॉटरी; रोहित पौडेल करणार नेतृत्व






