(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
BO Collection: होळीच्या सुट्टीचा ‘The Kerala Story 2’ ला मोठा फायदा; बॉक्स ऑफिसवर केली बंपर कमाई
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त २ मार्च ते ८ मार्चदरम्यान रुग्णालयात महिलांसाठी विशेष तपासणी शिबिर आयोजित करण्यात आली आहे. ९ ते १४ वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. लहान वयात दिले जाणारे हे लसीकरण भविष्यात सर्व्हायकल कॅन्सरपासून संरक्षण देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. प्रत्येक आईने आपल्या मुलीच्या आरोग्याबाबत सजग राहून योग्य वेळी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, हा या उपक्रमामागील प्रमुख संदेश आहे. आई आपल्या मुलीला देऊ शकणारी सर्वात मोठी भेट म्हणजे उत्तम आरोग्य, आणि वेळेवर केलेले लसीकरण ही त्या सुरक्षिततेची सुरुवात आहे, हा विचार अधोरेखित करण्यात आला आहे.
महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती करणे, सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधाबाबत माहिती देणे आणि एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व पटवून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमात ‘तिघी’ चित्रपटातील नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी आणि दिग्दर्शिका जिजीविषा काळे यांनी सक्रिय सहभाग घेत महिलांना स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संदेश दिला.
‘तिघी’ या चित्रपटात तीन स्त्रिया आपल्या आयुष्यातील संघर्षांना सामोऱ्या जात स्वतःची ओळख निर्माण करतात. स्वतंत्र व्हा, सक्षम व्हा आणि स्वतःच्या आरोग्याबाबत सजग राहा, हा संदेश या मोहिमेतूनही देण्यात आला आहे. स्त्री ही केवळ कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारी नाही, तर स्वतःच्या आयुष्याचीही ती समान भागीदार आहे, हा विचार अधोरेखित करण्यात आला आहे.
या चित्रपटाबद्दल बोलताना अभिनेत्री नेहा पेंडसे म्हणाली, “आपण घरासाठी आणि कुटुंबासाठी खूप काही करतो, पण स्वतःच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. ‘तिघी’मध्ये आम्ही ज्या सशक्त स्त्रियांची कथा मांडतो, त्याचप्रमाणे प्रत्येक आईने आपल्या मुलीच्या भविष्यासाठी आरोग्यदृष्ट्या सजग राहणे गरजेचे आहे. योग्य वयात लसीकरण ही तिच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची पायरी आहे.”
तसेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली, “स्वावलंबन म्हणजे फक्त आर्थिक स्वातंत्र्य नाही, तर आरोग्याबाबत जागरूक असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. महिलांनी स्वतःची काळजी घेणे ही स्वार्थाची नव्हे तर सामर्थ्याची खूण आहे. ९ ते १४ वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण ही भविष्यासाठीची सुरक्षित गुंतवणूक आहे. आई-मुलीचे नाते जसे जपले जाते, तसेच त्यांच्या आरोग्याचे संरक्षणही जपले गेले पाहिजे.”
सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ या चित्रपटात भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिग्दर्शिका जिजीविषा काळे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट येत्या ६ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आणि नेहा पेंडसे बायस यांनी केली आहे.






