Photo Credit- Team Navrashtra पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतुकीच्या नियोजनासाठी 'ट्राफिक बडी' यंत्रणा लवकरच होणार कार्यान्वित
पिंपरी : वाहतूक कोंडी, खराब रस्ते, बंद सिग्नल यंत्रणा, नियमांचे उल्लंघन, आणि अनधिकृत पार्किंग यासारख्या समस्यांबाबत नागरिक आता थेट वाहतूक पोलिसांशी संपर्क साधू शकणार आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी यासाठी ‘ट्राफिक बडी’ हा विशेष उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिक ८७८८६४९८८५ या क्रमांकावर व्हॉट्सअॅपद्वारे तक्रारी नोंदवू शकतात. लवकरच या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू होईल, अशी माहिती पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिली. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांवर ऑनलाईन चलन (ई-चलन) काढणे यामुळे अधिक सोपे होणार आहे. नागरिक पोलिसांना मदत करत ‘सीसीटीव्ही’सारखी भूमिका पार पाडतील, असा विश्वासही आयुक्त चौबे यांनी व्यक्त केला.
या उपक्रमाची माहिती देण्यासाठी पोलिस आयुक्तालयात आयोजित पत्रकार परिषदेत संकेतस्थळाचे अद्ययावत रूप, ट्राफिक बडी, आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी नव्या मोबाईल अॅपबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, स्वप्ना गोरे, विशाल गायकवाड, डॉ. शिवाजी पवार आणि बापू बांगर आदी अधिकारी उपस्थित होते.
RBI News: उशिरा पेन्शनवर 8 टक्के व्याज; रिझर्व्ह बँकेचा इतर बँकांना कडक आदेश
रस्त्यांवरील खड्ड्यांविषयी प्राप्त होणाऱ्या तक्रारी संबंधित शासकीय यंत्रणांकडे पाठविण्यात येणार आहेत. मात्र, जर तक्रारीनंतरही संबंधित रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही, तर महिन्याच्या शेवटी पुन्हा त्याबाबत पाठपुरावा केला जाईल. संबंधित संस्थांशी समन्वय साधून समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या उपक्रमातून सातत्याने तक्रारी होणारी ठिकाणे स्पष्ट होतील आणि त्या ठिकाणी उपाययोजना आखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) उपयोग केला जाईल. यासाठीची नियमावली तयार असून, लवकरच तिची अंमलबजावणी सुरू केली जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिली.
‘ट्राफिक बडी’चा स्मार्ट वापर – नागरिकांसाठी सुलभ उपाय
‘ट्राफिक बडी’ उपक्रमासाठी कोणताही स्वतंत्र अॅप डाऊनलोड करण्याची गरज नाही. ही सेवा नागरिकांसाठी ८७८८६४९८८५ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर उपलब्ध करण्यात आली आहे. या क्रमांकावर ‘Hi’ किंवा ‘Hello’ असा मेसेज केल्यानंतर, पुढील संवाद सुरू होतो. यामध्ये उपलब्ध पर्यायांमधून नागरिकांना आपली तक्रार नोंदवता येते. तक्रार दाखल केल्यानंतर त्यावर कोणती कार्यवाही झाली, तक्रारीची सद्यस्थिती काय आहे, याची माहितीही नागरिकांना त्याच क्रमांकावर मिळणार आहे. सध्या या सेवेचे प्राथमिक ‘बिटा व्हर्जन’ कार्यान्वित करण्यात आले असून, लवकरच ही सेवा पूर्ण क्षमतेने उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे शहरातील वाहतूक समस्यांवर नियंत्रण मिळविण्यास मदत होणार आहे.
आता शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य; अन् दांडी मारली तर…
ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मोबाईल उपयोजना
ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी खास उपयोजन (मोबाईल अॅप) तयार करण्यात येत आहे. या अॅपद्वारे त्यांना रुग्णवाहिका सेवा, नजीकच्या रुग्णालयांची माहिती, तसेच विविध शासकीय आरोग्य योजनांची माहिती सहज मिळू शकेल. सायबर फसवणुकीपासून संरक्षण कसे करावे, याबाबतही मार्गदर्शन व जनजागृती करण्यात येणार आहे. गरज पडल्यास तातडीची मदत देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. लवकरच हे अॅप प्रत्यक्षात कार्यरत होणार आहे.
संकेतस्थळाचे अद्ययावतीकरण…
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या pcpc.gov.in या संकेतस्थळाचे अद्ययावतीकरण करण्यात आले आहे. नागरिकांना पोलीस ठाण्याला भेट दिल्यानंतर पोलिसांच्या वर्तणुकीचा अनुभव शेअर करता यावे, यासाठी नवीन फीडबॅक फॉर्म तयार केला आहे. भाडेकरुंची माहिती ऑनलाईन माध्यमातून भरता येईल. वाहतूक चलन माहिती आणि दंड भरण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
ट्राफिक बडी हा उपक्रम लोकेशन बेस आहे. त्यामुळे तक्रारदाराला खोटी माहिती देता येणार नाही. तसेच तक्रारदाराला त्याच्या तक्रारीवर केलेल्या कारवाईची माहिती मिळेल. वाहतूक व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी नागरिकांना या माध्यमातून सूचना करता येतील. स्थानिक परिसरातील वाहतूक बदलाची माहिती देखील या माध्यमातून नागरिकांना मिळेल. असा उपक्रम करणारे राज्यातील पहिले पोलीस आयुक्तालय आहे.