बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) शाखा काटेवाडी (भवानीनगर) भारतीय चलन असलेले दहा रुपयांचे नाणे स्वीकारत नसल्याने अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने तक्रार केली होती. या तक्रारीनंतर बँकेच्या कर्मचाऱ्यांनी १० रुपयांचे नाणे स्वीकारण्यास सुरूवात केली.
भवानीनगर येथे युनियन बँकेची काटेवाडी शाखा आहे. या बँकेत मोठ्या प्रमाणावर खातेदार आहेत. भवानीनगर या ठिकाणी श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना असल्याने या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत असते. या ठिकाणी छोटे-मोठे व्यावसायिक दैनंदिन आपला भरणा करत असतात. या बँकेतील कर्मचारी दहा रुपयांचे नाणे स्वीकारत नसल्याने ग्राहक वैतागले होते. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे जिल्हाध्यक्ष दिलीप निंबाळकर हे स्वतः या बँकेत दहा रुपयांची नाणी जमा करण्यासाठी गेले. मात्र, बँकेतील कर्मचाऱ्याने १० रूपयांची नाणी स्वीकारण्यास नकार दिला.
भारतीय चलन नाकारल्याने दिलीप निंबाळकर यांनी थेट भवानीनगर पोलिस स्टेशन गाठत बँकेतील अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्याकडे रितसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी बँकेशी संपर्क साधून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावले असता, बँकेच्या संबंधित महिला अधिकाऱ्यांनी नरमाईचे धोरण घेत यापुढे आम्ही दहा रुपयांची नाणी स्वीकारू, असे सांगितले.
दरम्यान, ग्राहकांची यापूर्वी झालेली फसवणूक, नाहक मनस्ताप याला जबाबदार कोण, या अधिकाऱ्यांनी स्वतः दहा रुपयांची नाणी घेणे नाकारले की त्यांना वरिष्ठांच्या तशा सूचना होत्या, ग्राहक बँकेतून पैसे काढायला गेल्यास त्याला दहा रुपयांची नाणी बँक देते. मग ग्राहकाकडून ही नाणी का स्वीकारत नाही, असा सवाल करत ग्राहक पंचायतीने आता संबंधित बँकेतील जबाबदार अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
आरबीआयकडेही तक्रार
रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या राज्य प्रबंधकांकडे तशी तक्रार दाखल केली आहे. यावेळी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख विजय शिरसट, सणसरचे माजी सरपंच यशवंत पाटील, ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष किशोर भोईटे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जाधव,ग्राहक पंचायतीचे भारत विठ्ठलदास, वैभव निंबाळकर, दिपक नेवसे, दिलीप दुपारगुडे उपस्थित होते.
‘तारीख पे तारीख’ ग्राहक त्रस्त
युनियन बँक ऑफ इंडिया देशातील महत्वाची राष्ट्रीयीकृत बँक आहे. त्यामुळे बँकेच्या विश्वासार्हतेमुळे या बँकेत ठेवीदार व बचत खातेदारांची संख्या मोठी आहे. मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल या बँकेत करणारे ग्राहक कर्ज अथवा इतर कामांसाठी बँकेच्या अधिकाऱ्यांकडे आल्यानंतर त्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. बँकेचे शाखा व्यवस्थापक कामासाठी आलेल्या ग्राहकाकडे वारंवार दुर्लक्ष करतात, असा आरोप अनेक ग्राहकांचा आहे.
वास्तविक पाहता, बँक व्यवस्थापक यांच्याकडे कामाचा नेहमी व्याप असतो. मात्र, प्रत्येकवेळी नंतर बघू, कामाचा लोड आहे, पुढच्या महिन्यात या, अशी उत्तरे ग्राहकांना दिली जातात. बेरोजगार तरुण कर्जासाठी आल्यास त्याला व्यवस्थित माहिती न देता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून त्याचा एकप्रकारे अवमानच केला जात असल्याचे अनेक तरुणांनी सांगितले. यासंदर्भात अनेक ग्राहक बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले.
भारतीय चलन नाकारणे हा देशद्रोहाचा गुन्हा
भारतीय चलन नाकारणे हा देशद्रोहाचा गुन्हा आहे. या बाबतीत जिल्हाधिकारी हे सक्षम प्राधिकारी असून, त्यांनी सर्व सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकांना त्वरित आदेश देऊन दहा रुपयांची नाणी स्वीकारण्याचे आदेश द्यावेत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना कोणतेही आदेश नसताना युनियन बँक भवानीनगर दरवाजा बंद ठेवून ग्राहकांना खिडकीतून व्यवहार करायला मनमानीपणे लावते, यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाई करावी. तसेच भारतीय चलन नाकारणाऱ्या युनियन बँकेच्या संबंधित अधिकाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. याविषयी भारतीय रिझर्व बँकेच्या राज्य प्रबंधकांना पाठपुरावा केला जाईल.
– रमेश टाकळकर, राज्य महसूल समिती प्रमुख, अ.भा. ग्राहक पंचायत.