सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुरंदर तालुक्यातील क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवाचा लग्न सोहळा आणि त्याच दिवसापासून सलग १० दिवस यात्रा सुरु होते. दरम्यान श्री क्षेत्र कोडीत येथून श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या पालखीचे क्षेत्र वीरकडे १ फेब्रुवारी रोजी दुपारी प्रस्थान असून, त्याच रात्री देवाचा लग्नसोहळा पार पडणार आहे. तसेच ६ फेब्रुवारी पासून देवाची भाकणूक आणि गजे जेऊ घालण्यास सुरुवात होत आहे. यात्रेत कोडीत येथून जवळपास ९५ टक्के लोक यात्रा कालावधीत वीर येथे मुक्कामी असतात. तसेच पुरंदर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील आणि राज्याच्या विविध भागातून लाखो भाविक यात्रेला येत असतात.
वीरची यात्रा आणि निवडणूक प्रचाराची रणधुमाळी एकाच कालावधीत येत आहे. एवढेच नाही अगदी प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणी यात्रेच्या कालावधीतच येत आहे. पाच तारखेला मतदान आहे आणि याच काळात वीरची यात्रा असल्याने यात्रेनिमित्त पुरंदर हजारो ग्रामस्थ वीर मध्ये राहतील. परिणामी प्रशासनाला त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. मतदानाच्या दिवशी एवढे मतदार त्यांच्या गावात उपलब्ध होणार का ? हाही प्रश्न आताच उपस्थित होत आहे.
क्षेत्र वीर ठरणार उमेदवारांच्या प्रचाराचे केंद्र
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांचे नेते आणि उमेदवार त्यांच्या गट, गणात प्रचारानिमित्त व्यस्त राहणार आहेत. मात्र क्षेत्र वीर येथे दुपारी आणि संध्याकाळी छबिना चालत असतो आणि यामध्ये वेगवेगळ्या गावातील मानाच्या काठ्या, पालख्यासह ग्रामस्थही सहभागी होत असल्याने प्रचाराच्या वेळेत उमेदवारांना भेटणे अवघड आहे. त्यामुळे यात्रा सुरु असली तरी त्याच धामधुमीत मतदारांना शोधून मतदानाचे आवाहन करण्यासाठी उमेदवारांसह राजकीय पक्षांच्या नेत्यांना वीरमध्येच जावे लागणार आहे. परिणामी यात्रेच्या काळात वीर गाव आणि देवस्थानचा परिसर प्रचाराचे केंद्र बनणार आहे.
यात्रेसाठी दररोज लाखो लोखांची गर्दी
निवडणूक कालावधीत निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी यांचे काम मतदान केंद्राच्या आत चालते. मात्र पोलीस प्रशासनाला मतदान केंद्राबरोबरच सर्वत्र डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. क्षेत्र वीर येथील देवाच्या यात्रेसाठी दररोज लाखो लोखांची गर्दी होत असते. या गर्दीवर नियंत्रण ठेवणे आणि यात्रा सुरळीत पार पाडणे, यात्रेत कोणताही अनुचित प्रकार होवू न देणे यासाठी सासवड पोलीस विशेष काळजी घेत असतात. यासाठी सासवड पोलीस स्टेशन मधील संपूर्ण स्टाफ दहा दिवस वीरमध्ये ठाण मांडून असतो.
देवाचा लग्नसोहळा, भाकणूक आणि मारामारी (रंगाचे शिंपण) यात्रेच्या शेवटच्या दिवशी पोलिसांना इतर ठिकाणावरून बंदोबस्त मागवा लागत असतो. मात्र यात्रा आणि निवडणुकीचा बंदोबस्त एकत्र येत असल्याने त्याचा दुहेरी तणाव राहणार आहे. एका बाजूला यात्रा सुरळीत पार पाडून निवडणूक बंदोबस्त पुरविणे. तसेच राजकीय उमेदवार प्रचारानिमित्त वीरमध्ये मोठ्या संख्येने दिसणार असल्याने आचार संहितेचे पालन करतानाही सासवड पोलिसांची चांगलीच दमछाक होणार आहे.
हे सुद्धा वाचा : सायलेंट बिडकर विरुद्ध आक्रमक धंगेकर; पुणे महापालिकेत रंगलेली हायव्होल्टेज लढत
यापूर्वीची निवडणूक मारामारीच्या दिवशी आली होती
यापूर्वी नऊ वर्षापूर्वी पंचायत समिती, जिल्हा परिषदसाठी जे मतदान झाले होते. नेमके त्याच दिवशी वीरच्या यात्रेची मारामारी होती. त्यामुळे वीर, कोडीतसह काही गावात दुपारपर्यंत जवळपास शुकशुकाट होता. मारामारी झाल्यानंतर ग्रामस्थांना मतदानाच्या वेळेत मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी धावपळ करावी लागली होती. परिणामी सायंकाळी सात ते आठ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु होती. यंदाही यात्रेचा कालावधी असल्याने मतदारांचीही धावपळ होण्याची चिन्ह आहेत.






