पुरंदर तालुक्यातील तलाव, ओढे पाण्याने तुडुंब
सासवड: पुरंदर तालुक्यात यंदा मोठा दुष्काळ असल्याने टंचाईची तीव्रता मोठ्या प्रमाणात होती. तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येत होता. त्यातच तालुक्याला पाणी पुरवठा करणारी महत्वाची धरणे पूर्णपणे आटल्याने वीर धरणावरून पाणी पुरवठा करण्यात येत होता. मात्र अवकाळी पावसाने पुरंदर वरती चांगलीच कृपा केली आहे. एकीकडे पावसाने काही प्रमाणात नुकसान केले आहे, मात्र तालुक्यातील सर्वच धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने प्रशासनाने सर्व टँकर बंद केले आहेत. त्यामुळे यंदा प्रथमच मे महिन्यात पुरंदर तालुका टँकरमुक्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मागील वर्षी पावसाचे प्रमाण खूप अत्यल्प होते. त्यामुळे तालुक्यातील धरणांतील पाणी पातळी खूप खालावलेली होती. खरीप प्रमाणेच रब्बी हंगाम वायाला जाण्याची भीती होती. मात्र परतीच्या पावसाने तालुक्यावर कृपा केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. साधारण जानेवारीपर्यंत फारसी टंचाई जाणवत नव्हती. मात्र फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या तीन महिन्यात टंचाई ने उच्चांक गाठला होता. पुरंदरला पाणी पुरवठा करणारी गराडे, घोरवडी या प्रमुख धरणांसह इतर धरणाच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली. अगदी सासवड शहरातील पाणी वितरणवर त्याचा परिणाम जाणवला. दिवसाआड पाणी पाणी देण्याचा निर्णय घ्यावा लागला. तर ग्रामीण भागात टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरु करावा लागला होता.
तलाव, ओढे, नाले पाण्याने तुडुंब
मात्र मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला. साधारणपणे १० मे नंतर काही प्रमाणात पाऊस सुरु झाला. १४ आणि १५ मे रोजी अनेक ठिकाणी पाऊस झाला. तर त्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली. २० तारखेनंतर मात्र संपूर्ण राज्यातच मोठ्या प्रमाणत पाऊस झाला. सर्वच धरणे, नद्यांना पाणी आले, गावागावातील तलाव, धरणे, ओढे, नाले पाण्याने फुल्ल झाली. पुरंदर तालुक्याला पावसाने सलग आठवडाभर जोरदार हजेरी लावल्याने गावोगावी पाणी साठा वाढला. गराडे, घोरवडी हि दोन प्रमुख धरणे पूर्णपणे आटली होती. आवकाळीच्या पावसाने मात्र कृपा करीत धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली. त्याचबरोबर ग्रामीण भागातील विहिरी, ओढे, नाले याना चांगली पाणी आल्याने टयांकरच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाली. परिणामी मे महिन्यातच प्रशासनाला सर्व टँकर बंद करावे लागले.
१८ गावांना १७ टँकरमधून होते पाणी सुरू
एप्रिल महिन्याच्या मध्यावधी सोनोरी, झेंडेवाडी, राजुरी, वाल्हे, सिंगापूर, पोंढे, साकुर्डे, वागदरवाडी या गावांना टयांकर सुरु करण्यात आले. त्यानंतर पुन्हा एखतपूर, खानवडी, वाळूंज, रीसे, दौंडज, भिवरी अशा १८ गावांना १७ टँकर मधून. त्यानंतर त्यात वाढ करून २१ टँकर करण्यात आले. मध्यंतरी त्यात पुन्हा घट होवून १५ टँकर सुरु होते. मात्र २० मे नंतर सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने टँकरच्या मागणीत घट झाली. त्यामुळे प्रशासनाने तालुक्यातील सर्वच टँकर बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे पुरंदर पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सचिन घुबे आणि वरिष्ठ सहायक आर एच यादव यांनी सांगितले.