फोटो सौजन्य - Social Media
Akola News : अकोला शहरातील एमआयडीसी फेज-२ परिसरात सुरू असलेल्या आणखी एका अवैध गुटखा निर्मिती कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने धाड टाकत मोठी कारवाई केली. ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत प्रतिबंधित गुटखा निर्मितीसाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री, कच्चा माल आणि तयार गुटख्याचा साठा असा एकूण ५०.७२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
संत सोपानकाका महाराज पालखीत मेंढ्याचे रिंगण; शेतकरी-मेंढपाळांनी जपली पारंपरिक वारीची परंपरा
अटक करण्यात आलेल्यांमध्ये अशोक शर्मा (६०, रा. बलोदे ले-आऊट, अकोला) आणि अजय गुंजाळेकर (२४, रा. गायगाव, अकोला) यांचा समावेश आहे. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. एमआयडीसी परिसरातील अभिषेक गई यांच्या मालकीच्या गोदामात गौरव शर्मा हा यंत्रसामग्रीच्या मदतीने प्रतिबंधित गुटख्याचे उत्पादन करून त्याची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह संबंधित गोदामावर छापा टाकला. कारवाईदरम्यान कारखान्यात विविध ब्रँडच्या प्रतिबंधित गुटख्याचे उत्पादन सुरू असल्याचे उघड झाले. यानंतर अशोक शर्मा आणि अजय गुंजाळेकर यांना ताब्यात घेण्यात आले.
छाप्यात सुपारी बाइंडर मशीन, केमिकल मिक्सर, पॅकिंग व सीलिंग मशीन, ड्रायर, एअर कॉम्प्रेसर, पाउच प्रिंटिंग मशीन, कृत्रिम फ्लेवर्स, ग्लिसरीन, कच्ची सुपारी, कथ्था, मॅन्थॉल, तंबाखू, पॅकिंग साहित्य तसेच तयार गुटख्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ५०.७२ लाख रुपये आहे.
Dr. Kumar Saptarshi: ‘युक्रांद’चे संस्थापक, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षींचे निधन
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून गुटखा निर्मिती आणि वितरणाच्या साखळीतील इतर संबंधितांचा शोध घेतला जात आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अर्चित चांडक आणि अपर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, एमआयडीसी पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने केली.






