महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ग्रुप ग्रामपंचायत वावर वांगणी येथे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या विशेष दिनी वावर वांगणी ग्रामपंचायतमधील ग्रामस्थांनी श्रमदानातून मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवले आहेत.मागील तीन चार दिवसापासून मुसळधार पावसामुळे वावर ते जव्हार मुख्य रस्त्यावर ठीक ठिकाणी दरडी कोसळून रस्ते बंद झाले होते, तर काही मुख्य रस्त्यावरील मोठ मोठे खड्डे हे आधीच असल्यामुळे या कडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने या रस्त्यावरील प्रवास करणे हे खूप धोकादायक ठरत होते.
तसेच अपघाताची शक्यता जास्तीत जास्त असल्याने काल गुरुवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त वावर वांगणी ग्रामस्थांनी एक ध्येय ठेवून स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी एक दिवस श्रमदान करून रस्त्यावरील मोठ मोठे खड्डे पडलेले बुजवले.
यामध्ये घोडीपाडा येथे मुसळधार पावसामुळे दरड कोसळून रस्ता पूर्णपणे बंद झाला होता .हा रस्ता वावर वांगणी ग्रामस्थांनी श्रमदानातून पूर्णपणे मोकळा केला .तसेच लेंडी नदी जवळील वांगणी रस्त्यावर वरचे मोठे मोठे खड्डे हे श्रमदानातून बुजवले गेले.तसेच बेहेडगावा जवळील पूर्णपणे रस्ता हा मुसळधार पावसामुळे खाली गेल्याने या देखील रस्ता तात्पुरता वाहने ये जा करण्यासाठी केला गेला.या उपक्रमात लोकनियुक्त सरपंच विनोद बुधर ग्रामसेवक संदीप एखंडे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, रोजगार सेवक,महिला वर्ग तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.महात्मा गांधींच्या विचारांना अनुसरून स्वावलंबन, श्रमाची कदर करून वावर वांगणी ग्रामस्थांनी एक दिवस स्वतः आणि कुटुंबासाठी श्रमदान करण्याचे ठरवले.