रायगडसह अलिबाग व परिसरात कोणतीही परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसविले जात आहेत. स्मार्ट मीटरमुळे विजबील भरमसाठ येऊ लागले आहेत. या विरोधात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने अलिबागमधील चेंढरे येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. मीटर बसविणे बंद करा, भरमसाठ बील आलेले रद्द करा, अशा अनेक मागण्यांसाठी हा लढा पुकारण्यात आला. अखेर महावितरण विभागाचे अधिकारी या लढ्यासमोर नमले. त्यांनी आठ दिवसांत सकारात्मक कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले.
शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी भवन ते चेंढरे येथील महावितरण कंपनी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हातात लाल झेंडा घेत असंख्य कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. बंद करा, बंद करा स्मार्ट मीटर सक्ती बंद करा, सर्वसामान्यांवर होणारा अन्याय सहन करणार नाही, अशा घोषणा देत सरकार व महावितरण कंपनीविरोधात एल्गार पुकारण्यात आला. चेंढरे येथील महावितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता तायडे यांच्या कार्यालयात धडक मोर्चा नेला. सक्तीने बसवत असलेल्या स्मार्ट मीटरबाबत शेकापच्या संतप्त कार्यकर्त्यांनी जाब विचारला. कार्यकारी अभियंता जागेवर नसल्याने कार्यकर्त्यांचा संताप वाढला. न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार, जोपर्यंत लेखी उत्तर देत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन करणार असा इशारा ॲड. मानसी म्हात्रे यांनी दिला. अखेर कार्यालयात ठिया आंदोलन करण्यात आले.
सक्तीने बसविण्यात आलेले मीटर व भरमसाठ आलेले वाढीव वीजबील तात्काळ रद्द करा, खासगीकरणाचे पाऊल थांबवा, सर्वसामान्यांची होणारी आर्थिक पिळवणूक खपवून घेणार नाही, अशी सक्त ताकीद यावेळी अधिक्षक अभियंता धनराज बिक्कड यांना देण्यात आली. दिलेल्या निवेदनाची कार्यवाही करण्याबाबत लेखी उत्तर देण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. मात्र अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात आल्यावर शेकाप स्टाईलने त्यांना धारेवर धरण्यात आले.
शेकापच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले. महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांची धावाधाव सुरु झाली. अखेर महावितरण कंपनीचे अधिकारी शेकापच्या आंदोलनासमोर नमले. शेकापच्या लेखी निवेदनाची दखल तात्काळ घेण्यात आली. वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन सक्तीचे स्मार्ट मीटर न लावणे, लावलेले मीटर काढणे, वाढीव बिले रद्द करण्याबाबतची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी वरिष्ठ कार्यालय अलिबाग विभाग यांच्याकडे निवेदन पाठवित असून येत्या आठ दिवसामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन अतिरिक्त कार्यकारी अभियंता तायडे यांनी दिले. या अश्वासनानंतर ठिय्या आंदोलन थांबविण्यात आले.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी शेकाप राज्य कामगार आघाडीचे प्रमुख प्रदिप नाईक, तालुका चिटणीस सुरेश घरत, शेकाप तालुका सहचिटणीस नरेश म्हात्रे, शेकाप माजी तालुका चिटणीस अनिल पाटील, वेश्वीचे माजी सरपंच प्रफुल्ल पाटील, सतिश प्रधान, निखील पाटील, अनिल चोपडा,ॲड. निलम हजारे, नागेश कुलकर्णी, सुरेश पाटील, अशोक प्रधान, नागेश्वरी हेमाडे, प्रमोद घासे असे असंख्य विविध आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला, तरुण, तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मीटर लावण्याबाबत महावितरण अधिकारी अनभिज्ञ
अलिबाग शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी महावितरण कंपनीमार्फत स्मार्ट मीटर बसविले जात आहे. महावितरण कंपनीचे कर्मचारी घरोघरी जाऊन मीटर बसवित आहेत. मीटर का बसविले जात आहे, असा सवाल ॲड. मानसी म्हात्रे यांनी कार्यकारी अभियंता शैलेश कुमार यांना विचारला. त्यामुळे आम्ही मीटर बसवत नाही, असे सांगून आपल्याकडील जबाबदारी ढकल्याचे काम संबंधित अधिकाऱ्यांनी केले. त्यामुळे मीटर लावले जात असताना अधिकारी अनभिज्ञ असल्याचे यावरुन स्पष्ट झाले.
मनमानी कारभाराबाबत तीव्र नाराजी
स्मार्ट मीटर बसविण्याचे काम चालू आहे. त्याविरोधात शेकापच्या वतीने महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता शैलेश कुमार यांना पत्र दिले होते. त्यावेळी 31 जूलैला कार्यालयात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र शैलेश कुमार गुरुवारी कार्यालयात नसल्याने कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. अति महत्वाच्या कामात असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे शैलेश कुमार यांच्या मनमानी कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
शेकापची मागणी
अलिबाग तालुक्यातील व शहरातील विद्यूत ग्राहकांना स्मार्ट प्रिपेड मीटर लावण्याची सक्ती तात्काळ रद्द करावी.
विद्यूत ग्राहकांचे यापुर्वी बदलेले मीटर व नव्याने बसविलेले स्मार्ट मीटर तात्काळ काढून यापुर्वीच्याच मीटरची पुर्नजोडणी वितरण कंपनीच्या खर्चानेच करावी.ग्राहकांना विश्वासात न घेता, त्यांच्या नकळत बसविलेल्या स्मार्ट मीटरची आलेले भरमसाठ वीज बिले तात्काळ रद्द करावी.स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी नियमीत पध्दतीने येत असलेल्या युनिटनुसार बिलांच्या प्रमाणात वीज बील आकारण्यात यावेत.यापूर्वी बसविलेल्या स्मार्ट मीटर धारकांची यादी ग्राहकांना प्राप्त करून द्यावी. त्यांना मीटर तात्काळ रद्द करणार आहोत, याबाबत लेखी कळविण्यात यावेत.स्मार्ट मीटर जोडणी रद्द करण्यात येत आहे, याची जाहीर व लेखी स्वरुपात ग्राहकांना हमी द्यावी, असं सांगण्यात आलं आहे.