फोटो सौजन्य- प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारर्संहिता लागू झाली आहे. त्यानंतर राज्यात सर्वत्र तपासयंत्रणा कार्यरत झाल्या आहेत. पळस्पे चेक पोस्ट नाक्यावर आचारसहिंता पथकाद्वारे आज दि. 25 ऑक्टोबर 2024 ला करण्यात आलेल्या तपासामध्ये एका वाहनामध्ये 6 लाखांची रोकड आढळली ती पथकाने जप्त केली आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
पनवेल 188 विधानसभा मतदार संघ, निवडणूक विभाग अंतर्गत आचार संहिता पथकांतर्गत स्थिर सर्वेक्षण पथक क्रमांक ६ (एसएसटी पथक ) ने आज शुक्रवार दिनांक २५ ऑक्टोबर 2024 रोजी पळस्पे फाटा चेक पोस्ट येथे वाहन तपासण्याचे नियमित कर्तव्य करत असताना सकाळी ११:५५ वाजण्याचे दरम्यान गोवा-पनवेल हायवे रोडवरून जाणाऱ्या राखाडी रंगाच्या टाटा पंच चार चाकी गाडीस थांबवून पथकाने तपासणी केली. या तपासणीदरम्यान त्या गाडीमध्ये तब्बल 6 लाखांची रोख रक्कम आढळून आली. सदरील रक्कम संशयास्पद असल्याने ही रक्कम पथकामार्फत जप्त करण्यात आली.
सदर कारवाई 188 पनवेल विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईवेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय पाटील, आचारसंहिता पथक प्रमुख भारत राठोड, सहाय्यक खर्च निरीक्षक विजय फासे, सहाय्यक खर्च निरीक्षक संजय आपटे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय भालेराव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संदिप कराड,आचार संहिता पथक प्रमुख महेश पांढरे, आचार संहिता सनियंत्रण अधिकारी शरद गीते, सहाय्यक आचार संहिता पथक प्रमुख श्री.जी.एस.बहिरम, सहाय्यक आचार संहिता पथक समन्वयक दिनेश भोसले, नितेश चिमणे,तुषार म्हात्रे तसेच पळस्पे फाटा चेक पोस्टवरील एसएसटी पथकाचे प्रमुख किरण पोकळे, कामोठे पोलिस स्टेशन ठाण्याचे पोलिस शिपाई जितेश नवघरे,तळोजा पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई प्रकाश म्हस्के, खारघर पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई हौसराव खकाळ उपस्थित होते.
निवडणूक आचारसंहिता काळात राज्यभर अंमलबजावणी यंत्रणा तसेच तपास यंत्रणाकडून गैरप्रकार थांबवण्यासाठी मोठ्या फौजफाट्यासह तपास केला जात आहे. काल केवळ 24 तासामध्ये अंमलबजावणी यंत्रणांनी 50 कोटीहून जास्त रक्कमेचा मुद्देमाल जप्त केला होता. ज्यांच्याकडूनही हा मुद्देमाल जप्त केला गेला आहे. अशा सर्वांवर योग्य त्या प्रकारची कारवाईही या यंत्रणांकडून केली जात आहे.
सी-व्हिजिल ॲप (C-Vigil app)
आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल ॲप (C-Vigil app) हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून सजग नागरिकांना डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे जर कोणत्याही प्रकारच्या आचारसंहितेचा भंग झाला असेल तर त्याची तक्रार नागरिकांना करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाव्दारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येत आहे.