रोहा साधना नायट्रो केम कंपनीत भीषण स्फोट
रविंद्र कान्हेकर, रोहा : रोहा धाटाव एमआयडीसी मधील साधना नायट्रो केम कंपनीत सकाळी 11.15 वाजता भीषण स्फोट झाला. या स्फोटात दोन कामगार मृत्यूमुखी पडले तर चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटाची तीव्रता एव्हडी होती की, स्फोट झालेल्या कंपनी पासून एक किलोमीटर पर्यंत हादरा बसला. त्यामुळे काही काळासाठी आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांना शासकीय उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे हळविण्यात आले तर जखमींना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मुंबईला हळविण्यात आले आहे. स्फ़ोटात जखमी झालेल्या कामगारां पैकी दिनेश कुमार, संजित कुमार या दोन कामगारांचा मृत्यू झाला तर निलेश भगत, बासकी यादव, अनिल मिश्रा व सुरेंद्र कुमार हे कामगार गंभीर जखमी झाले आहेत.
धाटाव एमआयडीसी मधील प्लॉट नंबर-47 येथील साधना नायट्रोकेम लिमिटेड कंपनीत 11:15 वा.चे सुमारास ओडिबी -2 केमिकल प्लांट मध्ये ओडिबी -2 प्रॉडक्ट वॉशिंग करण्यासाठी असलेल्या मिथेनॉल केमिकलच्या स्टोरेज टॅंकवर एम. के. फॅब्रिकेटर्सचे सहा कामगार वेल्डिंग काम करीत असताना मेथानोल केमिकल टॅंकचा ब्लास्ट होऊन त्यात सहा कामगार जखमी झाले त्यापैकी दोन कामगार मयत झाले आहेत व चार कामगार जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे हळविण्यात आले.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा, आ. अनिकेत तटकरे यांनी भेट दिली. ऍम्ब्युलन्स, फायर ब्रिगेडच्या गाड्या त्वरित हजर झाल्याने जखमीना लगेचच मुंबईला रुग्णालयात हलवता येणे शक्य झाले. चालू कंपनीत एकाएकी होत्याचे नव्हते झाल्याने परिसरात भयान शांतता पसरली होती.