पर्यावरण संवेदशनशिल क्षेत्रात मिळणार बांधकाम परवानगी; पुनर्विकास प्रकल्प लागणार मार्गी
नवी मुंबई/सिद्धेश प्रधान : – इमारत बांधकाम, टाऊनशिप आणि नागरी, प्रादेशिक विकास प्रकल्पांसाठी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने नुकतीच एक अधिसूचना जारी करून दिलासा दिला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई , मीरा भाईंदर व राज्यातील अनेक शहरांमध्ये अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान आणि एमआयडीसीच्या 5 किलोमीटर परिघातील (पर्यावरण संवेदनशिल क्षेत्र) 20 हजार चौरस मीटर ते 1 लाख 50 हजारचौरस मीटर बिल्टअप विकास क्षेत्र असलेल्या प्रकल्पांना आता राज्य शासनाच्या पर्यावरण सनियंत्रण समितीकडून बांधकाम परवानगी मिळणे सोईचे होणार आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी यासाठी केंद्रीय पातळीवर केलेल्या पाठपुराव्यामुळे ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
ऑगस्ट 2024 साली राष्ट्रीय हरित लवादाच्या एका निर्णयामुळे अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान आणि एमआयडीच्या 5 किलो मिटर परिघातील 20 हजार चौरस मीटर ते 1 लाख 50 हजार चौरस मीटर बांधकाम क्षेत्र असलेल्या बांधकाम प्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या परवानग्या घेणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. मात्र या निर्णयाबाबत संदिग्धता असल्याने गेली 6 महिने राज्यातील अनेक बांधकाम विकास प्रकल्प रखडले होते. खासदार नरेश म्हस्के, शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी संवाद साधत मार्ग काढण्याची विनंती केली होती.
खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश येत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे संयुक्त सचिव रजत अग्रवाल यांनी या संदर्भात राजपत्रीय अधिसूचना जारी केली आहे. आता 20 हजार चौरस मीटर ते 1 लाख 50 हजार चौरस मीटर बिल्टअप विकास क्षेत्र असलेल्या बांधकाम प्रकल्पांना राज्य शासनाच्या पर्यावरण सनियंत्रण समितीकडून परवानग्या घ्याव्या लागणार आहे. या निर्णयामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई , मीरा भाईंदर व राज्यातील अनेक शहरांतील बांधकाम विकास, नागरी प्रकल्प मार्गी लागणार आहेत. या निर्णयामुळे केवळ विकासकांना दिलासा मिळाला नसून अनेक फ्लॅट खरेदीधारक, पुनर्विकास प्रकल्पांतील रहिवासी यांचाही फायदा होणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. यासाठी सहकार्य करणारे मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पर्यावरण ,वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव ,खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे खासदार नरेश म्हस्के, किशोर पाटकर यांनी जाहीर आभार मानले आहेत.