पुरुष नसबंदीचं प्रमाण नक्की किती? महाराष्ट्रातील या जिल्ह्यात इतक्या पुरुषांनी केली नसबंदी
कुटुंब नियोजनासाठी केले जाणाऱ्या नसबंदी शस्त्रक्रियेमध्ये अजूनही महिलांवरच जबाबदारी येते आहे. रायगड जिल्ह्यात जानेवारी २०२४ ते मार्च २०२५ अखेरपर्यंत फक्त १९ पुरुषांनीच नसबंदी शस्त्रक्रिया करून घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याच कालावधीत ५८२० महिलांनी शस्त्रक्रिया करून घेतली आहे. म्हणजेच पुरुष नसबंदीचे प्रमाण केवळ ०.३२ टक्के आहे.
महिलांच्या तुलनेत पुरुष नसबंदीचे प्रमाण नगण्य आहे. आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांनंतरही पुरुषांचा सहभाग अत्यंत कमी असल्याचे या आकडेवारीवरून दिसते. प्रत्येक वर्षी महिलांचे उद्दिष्ट साध्य होत असतानाही पुरुषांचे योगदान सुमारच आहे. पुरुष नसबंदी ही तुलनेत सोपी, वेदनारहित आणि कमी धोक्याची असूनही अनेक गैरसमज आणि सामाजिक मानसिकतेमुळे पुरुष पुढे येत नाहीत.
99% पुरुषांना माहीत नाही Private Part स्वच्छ करण्याची पद्धत, तज्ज्ञांकडून जाणून घ्या हायजीनची गोष्ट
पोलादपूर तालुक्यात सर्वाधिक ८ पुरुषांनी नसबंदी केली, जे एकूण आकडेवारीच्या निम्म्याहून अधिक आहेत. रोहा व माणगाव तालुक्यात प्रत्येकी ३ पुरुषांनी शस्त्रक्रिया केली. महाड व श्रीवर्धन येथे प्रत्येकी १ पुरुष पुढे आला. उर्वरित ९ तालुक्यांत एकाही पुरुषाने नसबंदी शस्त्रक्रिया केलेली नाही. तुलनात्मक दृष्टिकोनातून पाहता, २०२४ मध्येही केवळ ४ पुरुषांनी नसबंदी केली होती. यंदा ती संख्या थोडी वाढली असली तरी जिल्ह्याच्या एकूण उद्दिष्टाच्या तुलनेत ती फारच कमी आहे. गेल्या दोन वर्षात पनवेल, पेण, तळा, उरण, पाली, मुरुड या तालुक्यांत एकाही पुरुषाने नसबंदी केलेली नाही.
पुरुष नसबंदी ही विनाटाका शस्त्रक्रिया यामध्ये असते. अंडकोशातील वीर्यवाहिनी कापून बंद केली जाते. या प्रक्रियेनंतर ३ महिने संरक्षण साधनांचा वापर आवश्यक असतो. या शस्त्रक्रियेला पुन्हा उलटवण्याचीही (reversal) सुविधा असून यशाचे प्रमाण सुमारे ५० टक्के आहे. केंद्र सरकारकडून पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेसाठी ११०० रुपये, तर राज्य सरकारकडून ३५१ रुपये दिले जातात. महिला लाभार्थ्यांनादेखील आर्थिक लाभ दिला जातो, तरीही पुरुषांनी यामध्ये सहभागी न होणे ही आरोग्य व्यवस्थेसमोरील मोठी अडचण आहे.
आरोग्य यंत्रणा, समाजसेवक, आणि स्वयंसेवी संस्थांनी आता पुरुष नसबंदीबाबत जनजागृती मोहीम अधिक तीव्रतेने राबवण्याची गरज आहे. अन्यथा कुटुंब नियोजनाची जबाबदारी नेहमीप्रमाणे महिलांवरच राहणार आणि त्यांच्या आरोग्यावर
त्याचा विपरीत परिणाम होणार, हे निश्चित.