(फोटो सौजन्य: istock)
आजच्या धावपळीच्या दुनियेत लोक आपल्या आरोग्याची काळीजी घ्यायला विसरून गेले आहेत. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव यामुळे लोकांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या वाढत आहेत. अनेक आजार झपाट्याने वाढत असतानाच अनेकांमध्ये हाय कोलेस्ट्रॉलची समस्या वाढताना दिसून येत आहे. शरीरात वाढणारं हे कोलेस्ट्रॉल वेळीच रोखलं नाही किंवा यावर योग्य त्या उपाययोजना केल्या नाहीत तर आपल्याला गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. यामध्ये हृदयरोग, रक्तदाब आणि अनेक गंभीर आजारांचा समावेश आहे.
अशात निरोगी राहण्यासाठी आपल्याला आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून ती नियंत्रणात करायला हवी. आता ते कसं करायचं असा प्रश्न जरा तुम्हाला पडला असेल तर याचंच उत्तर देण्यासाठी आजचा हा लेख लिहिण्यात आला आहे. कोलेस्ट्रॉलच्या समस्येसाठी तुम्हाला कोणतीही औषधे खरेदी करण्याची गरज नाही तर तुम्ही घरीच एका सोप्या उपायाने तुमच्या शरीरातील सर्व घाण कोलेस्ट्रॉल शरीराबाहेर काढू शकता. यासाठी तुम्ही आल्याच्या पाण्याची मदत घेऊ शकता. अनेक आजार दूर करण्यासाठी आलं फायदेशीर मानलं जातं अशात आल्याचं हे पाणी नसांमध्ये साचलेलं घाणेरडं कोलेस्टेरॉल देखील लवकरात लवकर बाहेर काढण्यास प्रभावी ठरते. ते केवळ कोलेस्टेरॉलची पातळी राखत नाही तर आरोग्यासाठी अनेक फायदे मिळवून देते.
कोलेस्टेरॉलची पातळी करते कमी
आल्याचे सेवन कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात करण्यासाठी फार फायदेशीर मानली जाते. जर तुम्ही नियमित सकाळी आल्याच्या पाण्याचे सेवन केले तर निश्चितच ते तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करेल. वास्तविक, आल्यात जिंजरॉलसारखे बायोएक्टिव्ह संयुगे आढळतात. हे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात . तसेच ट्रायग्लिसराइड्स देखील राखू शकतात.
आल्याचे पाणी कसे बनवायचं?
आल्याचे पाणी तयार करण्यासाठी फार मेहनत घेण्याची गरज नाही तर तुम्ही सहज आणि अगदी २ मिनिटांत ते घरी तयार करू शकता. यासाठी आधी एक इंचाचा आल्याचा तुकडा घ्या आणि त्याला सोलून पाण्याने स्वछ धुवून घ्या. यांनतर एका भांड्यात एक ग्लास पाणी आणि आल्याचा तुकडा घालून हे पाणी उकळत ठेवा, जोपर्यंत पाणी अर्धे होत नाही तोपर्यंत याला उकळवत ठेवा आणि मग गॅस बंद करून हे पाणी गाळून घ्या. पाणी कोमट असताना याचे सेवन करा.
आल्याच्या पाण्याचे फायदे काय?
आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे अपचन, पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि मळमळ यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. ते जळजळ कमी करण्यास मदत करते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते.
आल्याचे पाणी कधी प्यावं?
अनेक लोक आल्याचे पाणी सकाळी रिकाम्या पोटी पितात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. तुम्ही जेवणानंतरही याचे सेवन करू शकता.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.